संतापजनक! कर्नाटकात मराठी तरुणीवर सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये वैद्यकीय शाखेत शिकणाऱया मराठी तरुणीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. नराधमांनी पीडित तरुणीच्या प्रियकरालाही बेदम मारहाण केली. तसेच बलात्काराचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत तीन लाख रुपयांची मागणी केली. घटनेला 48 तास उलटून गेल्यानंतरही नराधम मोकाट असून या घटनेविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

म्हैसूरमधील ललिथाद्रीपुरा परिसरात मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या नराधमांनी पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्या प्रियकराला दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पीडित तरुणी व तिचा प्रियकर बेशुद्ध पडल्यानंतर नराधमांनी पळ काढला. तब्बल सहा तासांनी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नराधमांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक नेमले आहे.

हे काही नवीन नाही – गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

बलात्काराच्या घटनेवरून संताप व्यक्त होत असतानाच कर्नाटकचे मंत्री शिवराम हेब्बर यांनी वादग्रस्त विधान केले. हे काही नवीन नाही. इतर सरकारांच्या काळातही अशा सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, असे विधान हेब्बर यांनी केले.