
कोरोना संकटाने गेल्या दीड वर्षांपासून भक्ताला देवापासून दूर ठेवले. गर्दी टाळण्यासाठी मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेशबंदी करावी लागली. देवदर्शन दुर्लभ झाले. पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी हजारो कोस पायी वारीने पंढरपूरला जाणाऱ्य़ा वारकऱ्य़ांचे दुःख त्यात मोठे होते. निर्बंधांमुळे देव भेटेनासा झाला. शेकडो वर्षांची परंपरा खंडीत करून माऊलींची, तुकोबांची पालखी बसने पंढरपूरला न्यावी लागली. आषाढी वारी करता आली नाही पण 15 नोव्हेंबरची कार्तिकी वारी मात्र वारकऱ्य़ांना करता येणार आहे. तसे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ अशा चार प्रमुख वाऱ्य़ा असतात. ‘भेटी लागी जीवा, लागलीसे आस’ अशा निर्मळ, पवित्र भावाने वारकरी बांधव पंढरपूरला रवाना होत असतात. या वाऱ्य़ांमधून दरवर्षी सुमारे दहा लाख भाविकांची मांदियाळी पंढरपुरात होते. ज्ञानोबा माऊली, तुकोबा आदींच्या पालख्यांबरोबर हजारो भाविक पायी चालत पंढरीला पोहोचतात. तिथे पांडुरंगाचे डोळे भरून दर्शन घेतात. विठुरायाच्या दर्शनाने त्यांचा इतक्या दिवसांचा थकवा, क्षीण क्षणार्धात निघून जातो.
कोरोनामुळे 17 एप्रिल 2020 पासून एकही पंढरपूर वारी झाली नाही. मानाच्या पालख्या निवडक वारकऱ्य़ांच्या उपस्थितीत एसटी बसने पंढरपूरला पाठवून परंपरा अबाधित राखली गेली. वारीमध्ये खंड पडला पण पालख्या पंढरपूरला पोहोचल्या आणि पांडुरंगाची-त्यांची भेट झाली. ‘याची देही’ आपल्याला पंढरीला जाता आले नाही अशी खंत नित्यनेमाने वारी करणाऱ्य़ा वारकऱ्य़ांनी व्यक्त केली. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते आवश्यक होते या जाणीवने वारकरी बांधवांनी आषाढी एकादशीला घरीच राहून पंढरीरायाची आळवणी केली.
भक्ताला देवापासून दूर ठेवणारा कोरोना आता पांडुरंगाच्या कृपेने नियंत्रणात आला आहे. निर्बंध शिथिल झाले आहेत. येत्या 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीनिमित्त वारी होणार आहे. दोन वर्षे पांडुरंगाचे दर्शन न झाल्याने कार्तिकी एकदशीला पंढरीत भाविकांची, वारकऱ्य़ांची गर्दी होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पंढरपूरातील जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने वारीसाठी स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
वारकऱ्य़ांची आता पांडुरंगाशी भेट होऊ शकणार आहे. कार्तिकी वारीलाही हजारो वारकरी पंढरपुरात जातात. आषाढ वारीला माऊली पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला येतात तर कार्तिकी वारीच्या वेळी पांडुरंग माऊलीकडे जातो. शतकानुशतके पांडुरंगाच्या भेटीचा हा सोहळा सुरू आहे. कार्तिकी वारीला जाता येणार असल्याने वारकऱ्य़ांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. ‘माझ्या पांडुरंगाची भेट होणार’ ही भावनाच त्यांच्यासाठी स्वर्गीय आनंद देणारी आहे.
पांडुरंगच पावला
गेली दोन वर्षे वारकऱ्य़ांना पांडुरंगाचे दर्शन झाले नाही. 1980 मध्ये मी तुळशीमाळ गळ्यात घातली आणि वारीला सुरुवात केली. दरवर्षी कार्तिकी एकादशीला पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेत होतो. आज माझे वय 70 वर्षे आहे. यंदा पंढरपूरला जाता येईल याबद्दल आनंदच आहे. कार्तिकी वारी ही दिवाळीच्या दिवसात येते. त्यामुळे तो एक आनंद सोहळाच असतो. या वारीसाठी वारकरी पायी कमी जातात. वाहनाने पंढरपूर गाठतात आणि चंद्रभागेत दशमीच्या दिवशी स्नान केले जाते. त्यानंतर एकादशीदिनी विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते. दरवर्षी गणपतीच्या काळात या वारीसाठी गाडीचे बुकाRग होते. यावर्षी ते शक्य झाले नसले तरी लसीकरण पूर्ण झालेले वारकरी कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन घेऊ शकणार असतील तर पांडुरंगच पावला. त्याविना न लगे सुखाचा सोहळा… लागे मज ज्वाळा अग्नीचिया! – बापूनाथ जनू गोसावी, सांताक्रुझ
दोन वर्षांनी योग आला
कार्तिकी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेता आले तर वारकरी धन्य होतील. आस लागून राहिलीय त्यांना. आमच्या घराण्यात आजोबांपासून वारीची परंपरा कायम आहे. मी गेली 25 वर्षे कार्तिकी वारी करतोय. कोरोनामुळे भगवंताची भेट होऊ शकली नाही. कार्तिकीला झाली तर ती त्याचीच कृपा. दोन वर्षांनी योग आला त्याच्या दर्शनाचा. पंढरपुरातही वारकऱ्य़ांची अलिकडे एक बैठक झाली. कोरोना आता नियंत्रणात आला आहे. त्यामुळे कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आता वारीला परवानगी मिळाली पाहिजे अशी आमची शुद्ध भावना आहे. – गणपत सदाशिव गावखडकर, प्रभादेवी





























































