कश्मीरातील बारामुल्लामध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिह्यातील सोपोरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्र आणि दारूगोळाही जप्त केला आहे. सोपोरमधील चकमक संपल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बारामुल्ला जिह्यातील सोपोर भागातील पेठसीरमध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सोमवारी रात्री येथे शोधमोहीम सुरू करण्यात आली. मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली होती.

कश्मिरात यंदा 100हून अधिक दहशतवादी ठार

मृत तीन दहशतवादी आणि त्यांच्या दहशतवादी गटाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विट केले की, ‘या वर्षी जम्मू-कश्मीर पोलीस, सीआरपीएफ, लष्कराचे ‘चिनार कॉर्प्स’ यांनी कश्मीर विभागात 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

  • श्रीनगरमध्ये सोमवारी पोलिसांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. दोन्ही दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित ‘द रेझिस्टन्स प्रंट’ या दहशतवादी संघटनेचे होते. चकमकीच्या ठिकाणाहून पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात शस्त्रही जप्त केली.
  • ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक अब्बास शेख आहे, जो लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर आणि ‘टीआरएफ’चा स्वयंघोषित प्रमुख होता. दुसरा दहशतवादी साकीब मंजूर होता, जो अब्बास शेखचा डेप्युटी होता. दोन्ही दहशतवादी श्रीनगरमधील अलुची बाग येथे मारले गेले.