
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कश्मीरच्या नौहट्टा शहरात जन्मदात्या पित्यानेच पोटच्या नवजात मुलाला जिवंत दफन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाने प्रसंगावधान राखत पोलिसांना बोलवले. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचल्याने मुलाचा जीव वाचला आहे. पोलिसांनी मुलाचे वडिल मंजूर हुसैनला अटक केली आहे. मुलाला जन्मापासूनच गंभीर आजार असल्याचे निदान झाले. त्याच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याला जिंवत दफन करण्याचा निर्णय घेतला असे मंजूरने पोलिसांना सांगितले.
नौहट्टा शहरात जमावाने एका व्यक्तीला पकडले असून तो आपल्या नवजात मुलाला जिंवत दफन करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून मंजूरला अटक केली. नवजात मुलाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मंजूरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. नवजात मुलाला गंभीर आजार असल्याचे निदान झाले. मात्र, त्याच्या उपचारासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे या मुलाला दफन करण्याचा प्रयत्न केल्याचे मंजूरने सांगितले. मंजूरविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.
























































