कश्मीरात दोन एके 47 रायफल्ससह बेपत्ता झालेल्या एसपीओला अटक, जैशच्या तीन दहशतवाद्यांसह घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीर पोलिसांनी रविवारी 2 एके 47 रायफल्ससह दोन महिने बेपत्ता असलेल्या विशेष पोलीस अधिकाऱयाला (एसपीओ) बडगाम विभागातील चतरा  गावातून जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांसह ताब्यात घेतले. हा एसपीओ 24 ऑक्टोबरपासून बेपत्ता होऊन दहशतवादी गटाला जाऊन मिळाला होता असे बडगाम पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.

अल्ताफ हुसेन याची कश्मिर पोलिसांनी नागरिकांसाठी सुरु केलेल्या दहशतवादविरोधी पथकात विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) म्हणून काही महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली होती. अल्ताफने जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी संधान साधून काही महिन्यांपूर्वी आपली एके 47 रायफल घेऊन पोबारा केला होता. तो दहशतवाद्यांसह बडगामच्या चतरा गावातील हयातपोरात येणार असल्याची खबर गुप्तचरांना मिळाली. त्यानंतर हिंदुस्थानी लष्कर, जम्मू कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकाने चतरा गावाला वेढा घालत फरार एसपीओ अल्ताफसह जैशचे पुलवामा निवासी दहशतवादी शब्बीर अहमद भट, जमशेद मगरे आणि जाहिद दार  यांना मोठय़ा प्रमाणातील दारुगोळ्यासह अटक केले. कश्मीर खोऱयात जिहादी धमाके घडवण्याचा या चौघांचा कट होता असे पोलिसांनी सांगितले.