
महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱयांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. रुग्णांना वेळेवर नाश्ता व भोजन मिळत नाही. अपुऱया मनुष्यबळामुळे सफाई कामगारांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घालणार आहे.
कस्तुरबा रुग्णालयात वॉर्डबॉय आणि आया-बाई यांची संख्या अपुरी असल्याने सफाई कामगारांना त्यांच्या नियमित कामांव्यतिरिक्त इतर जबाबदाऱयाही पार पाडाव्या लागत आहेत. परिणामी, स्वच्छतेची कामे प्रलंबित राहत असून कर्मचाऱयांवरील कामाचा ताण वाढून रुग्णसेवेच्या कामकाजावरही परिणाम होत आहे.
कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतील विसंगती दूर करणे, रिक्त पदे भरणे, सेवा कालावधीनुसार आश्वासित प्रगती योजना लागू करणे, गणवेश व शिलाई भत्ता देणे, वॉर्डबॉयचा प्रलंबित भत्ता अदा करणे आणि इतर आर्थिक लाभ मिळवून देणे, अशा मागण्या युनियनने केल्या आहेत. या प्रश्नांवर चर्चा होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱयांमध्ये नाराजी आहे. मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहसरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले की, कर्मचाऱयांचे प्रश्न वारंवार मांडूनही त्यांची सोडवणूक होत नाही. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य), प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख तसेच कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे.


























































