कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकील झाले अतिरिक्त महाधिवक्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकिलपत्र घेणारे असीम सहानी यांची जम्मू-कश्मीर सरकारने राज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. जम्मू कश्मीर सरकारच्या या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होत असून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

जम्मू-कश्मीर सरकारने मंगळवारी ३१ वकिलांची अतिरिक्त महाधिवक्ता, उपमहाधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. यातील १५ जणांची उच्च न्यायालयाच्या कश्मीर विंगसाठी तर १६ जणांची जम्मू विंगसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यात असीम सहानी यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहानी हे याआधी जम्मूचे उपमहाधिवक्ता होते.

सहानींच्या नियुक्तीवर जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी टीका केली आहे. ‘आरोपींच्या वकिलांची अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करणं हे प्रचंड धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा झाला आणि आज एका लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्यांचे वकिलपत्र घेणाऱ्या व्यक्तीला मोठ्या पदावर बसवण्यात येते. हा फार मोठा विरोधाभास आहे. राज्यपाल एनएन वोहरा यांनी यात मध्यस्थी करून लक्ष घालावे, असे मुफ्ती यांनी ट्विट केले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. ‘सरकारकडून दररोज अशाप्रकारेच विचित्र निर्णय घेतले जातात. पीडित मुलीच्या वकिलाचे खटल्यावरून लक्ष हटविण्यासाठी सरकारने ही नियुक्ती केली आहे. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला न्याय मिळवून द्यावा’, असे ओमर यांनी ट्विट केले आहे.