
नाटक, टीव्ही मालिका किंवा चित्रपट माध्यम असो, मराठी प्रेक्षकांच्या आवडीची नस दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘सही’ पकडलेली आहे. सामान्य माणसाच्या सभोवतालचे विविध ‘संवेदनशील’ विषय उत्तम पद्धतीने केदार शिंदे यांनी आपल्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत.
आता तीन वर्षांच्या गॅपनंतर केदार शिंदे यांचा नवीन मराठी चित्रपट येत असून वैशिष्टय़पूर्ण नावामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘बाईपण भारी देवा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून अतिशय वेगळ्या अंदाजात या चित्रपटाचे पोस्टर आज सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉटस् या संस्थेची पहिली निर्मिती आहे. गॉगल आणि त्यावर चंद्रकोर असलेल्या या पोस्टरवरून चित्रपटाच्या वेगळेपणाचा अंदाज येतो. तसेच ‘नो टेन्शन, फुल्ल टशन’ या पॅच लाइनमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्पंठा अधिक वाढली आहे. 28 मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.





























































