वहिनीची थट्टा करण्यासाठी नणंद आणि भाचीने बनवले बनावट फेसबुक अकाउंट, नवजात बाळासह तिघांचा नाहक बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट फेसबुक आयडी तयार करून नणंद आणि भाचीने वहिनीची थट्टा केल्याचा प्रकार केरळमध्ये घडला आहे. या नाहक थट्टेमुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये एका नवजात बालकाचाही समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे.

केरळमधील कोल्लम जिल्ह्यात जानेवारी महिन्यात जन्माला आलेले एक नवजात बालक काही तासांतच सुकलेल्या पानांच्या ढिगाऱ्यावर पडलेले पोलिसांना सापडले होते. या बाळाला त्यांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. कोल्लममधील कल्लुवाथुकल गावात राहणारी रेश्मा नावाची महिला ही त्या नवजात बाळाची आई असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी तिला जून महिन्यात अटक केली.

फेसबुकवरून आनंदू नावाच्या व्यक्तिसोबत तिची मैत्री झाली. या व्यक्तिसोबत राहण्याकरिता रेश्माने तिच्या बाळाला सुकलेल्या पानांच्या ढिगाऱ्यावर सोडून दिले होते. आश्चर्य म्हणजे ज्याच्यासोबत तिची फेसबुकवरून मैत्री झाली होती त्या व्यक्तिला ती यापूर्वी कधीही भेटली नव्हती, अशी माहिती रेश्माने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी रेश्माचे लग्न विष्णु नावाच्या व्यक्तिसोबत झाले होते. तिने विष्णुच्या कुटुंबातील कोणालाच ती गरोदर असल्याचे सांगितले नाही. पोलिसांनी तिची फेसबुकवरून ओळख झालेल्या व्यक्तिबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रेश्माची नणंद आर्या आणि भाची  ग्रीष्मा यांनाही चौकशीकरिता बोलावले. कारण रेश्मा तिच्या अनेक फेसबुक अकाउंटपैकी एक फेसबुक अकाउंट आर्याच्या नावाने घेतलेल्या सिमवर चालवत होती, पण पोलिसांनी चौकशीकरिता बोलवल्यानंतर आर्या आणि ग्रीष्मा यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केली.

याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी ग्रीष्माच्या एका मित्राकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, आर्या आणि ग्रीष्मानेच आनंदू नावाने एक बनावट फेसबुक अकाउंट बनवले होते. या बनावट फेसबुक आयडीवरून त्या दोघीही रेश्माची थट्टा करत असतं. तसेच आर्या तिच्या वहिनीची अशा प्रकारे गंमत करत आहे, ही गोष्ट तिने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या सासूला सांगितली होती. पोलिसांनी या घटनेचा शोध लावल्यानंतर आर्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजले. याबद्दल तिच्या नवऱ्याने पोलिसांचे आभारही मानले.  त्याला याविषयी काहीही माहिती नसल्याचेही त्याने मान्य केले.

सध्या आरोपी रेश्माला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे तिला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी रेश्माला अटक केल्याचे कळल्यानंतर तिचा नवरा परदेशातून घरी आला. त्याने पोलिसांना सांगितले की, जर याबाबत मला आधीच माहिती मिळाली असती तर मी हे थांबवण्याचा प्रयत्न केला असता.