
निगडोली गावात रघुनाथ फराट (७५) व सुरेखा फराट (७२) या वृद्ध दाम्पत्याच्या निघृण हत्येने संपूर्ण खालापूर तालुका हादरला आहे. हत्येचे गूढ कायम असून त्यांना गळा चिरून कोणी व का मारले याचा २४ तासांनंतरही पोलिसांना तपास लागलेला नाही. अज्ञात मारेकरी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पाच विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. हत्येमुळे फराट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निगडोली गावातील काही संशयास्पद लोकांचीही कसून चौकशी करण्यात आली असून लवकरच मारेकरी पकडले जातील असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
रघुनाथ फराट हे बँकेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना दोन मुले असून किशोर फराट हा खोपोलीत तर रोहिदास फराट हा खालापूरमध्ये राहतो. मंगळवारी रोहिदास याने आपल्या वडिलांना वारंवार फोन केला, पण समोरून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. नेमके काय झाले हे कळत नव्हते. वडील फोन उचलत नसल्याने आपला मुलगा आदित्य याला निगडोली गावात जाऊन चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार आदित्य आपल्या आजोबांच्या घरी गेला. त्याने घराचा दरवाजा अनेकदा वाजवला, पण दरवाजा कुणीच उघडत नव्हते. अखेर त्याने मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला. आत जाताच आजी सुरेखा व आजोबा रघुनाथ हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
अंगावर राख व पालापाचोळा
नातू आदित्य याने घाबरलेल्या अवस्थेतच आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. घटनास्थळी अतिशय भयानक दृश्य दिसत होते. रघुनाथ फराट यांचा गळा चिरलेला होता, तर सुरेखा फराट यांच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार केले होते. तसेच त्यांच्या अंगावर राख व पालापाचोळा टाकण्यात आला होता. त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे न समजल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे



























































