
खार पश्चिमच्या जयभारत सोसायटी परिसराची तब्बल 15 वर्षांनंतर पाणी तुंबण्याच्या समस्येतून सुटका झाली आहे. या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून 915 मीटर अंतराची नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आली. या कामासाठी पालिकेने 4 कोटी 60 लाखांचा खर्च केला.
मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यास खार (पश्चिम) भागातील जयभारत सोसायटी परिसरात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना करूनही त्यात यश येत नव्हते. साचलेल्या पाण्याचा निचरा वेगाने होत नव्हता. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता आणि वाहतुकीवरदेखील विपरीत परिणाम होत होता. त्यामुळे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने या विभागातील तिसरा रस्ता येथील वृंदावन हॉटेल ते रेल्वे वसाहत आणि जयभारत सोसायटीचा उपमार्ग ते रेल्वे बंदिस्त प्रवाह मार्ग (कल्व्हर्ट) क्रमांक 24-अ पर्यंत चौकोनी आकाराची नवीन पर्जन्य जलवाहिनी बांधली. पूर्वीची 0.6 मीटर आकाराची पर्जन्य जलवाहिनी बदलून नवीन जलवाहिनी टाकली. त्यामुळे यंदा जोरदार पाऊस कोसळत असतानाही आता पाण्याचा वेगाने निचरा होत आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली केले असून या कामाबद्दल माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी पालिका प्रशासनाचे रहिवाशांच्या वतीने आभार मानले आहेत.
























































