लोटे औद्योगिक वसाहतीत चोरी करणारे चोरटे गजाआड, खेड पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कारखान्यात चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात खेड पोलिसांना यश आले आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांनी ही कारवाई केली. चोरट्यांकडून 7 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर या कंपनीत चोरी झाल्याचे तक्रार कंपनीचे व्यवस्थापक विकी बालाजी सूर्यवंशी यांनी खेड पोलिसात दिली होती. 9 जुलै रोजी पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत रात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान चोरी झाल्याने तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रार दाखल करून खेड पोलिसांनी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुजित गड्दे, एपीआय डी बी कदम यांनी तपास सुरू केला होता.

या दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या हृतिक रामदास, दर्शन गायकवाड, सोहम आंब्रे, साबीर शेख, अजिंक्य आंब्रे, आणि दिवेश आंब्रे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला संशयित आरोपींची उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले.

या संशयित आरोपींकडून पोलिसांनी 7 लाख 70 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्याने न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपस करत आहे.