खेड-जैतापूर एसटी बसला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, खेड

खेड तालुक्यातील जैतापूर येथे प्रवाशी घेऊन गेलेल्या एसटी बसला परतीच्या प्रवासादरम्यान तळे काळकाई कोंड येथे अपघात झाला. चालकाने सारे कौशल्य पणाला लावून गाडी सुरक्षितपणे गटारात उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. हा अपघात सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खेड आगाराची खेड जैतापूर ही सकाळी 6.30 वाजता सुटणारी बस नेहमीप्रमाणे जैतापूरला पोहोचली. परतीच्या प्रवासादरम्यान हे बस काळकाई कोंड येथे आली असता अरुंद व निसरड्या रस्त्यामुळे अपघातग्रस्त झाली. बस घसरणार हे लक्ष्यात येताच चालकाने प्रसंगावधान राखून बस सुरक्षितपणे रस्त्याकडेच्या गटारात उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. या बसमधून खेड येथील महाविद्यालयात येणारे अनेक विद्यार्थी होते. बस गटारात उतरल्याने बसचा दरवाजा बंद झाला होता. मात्र विद्यार्थी आणि प्रवासी मागच्या खिडकीतून बाहेर आले.