
सामना प्रतिनिधी । चिरनेर
उरण तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या खोपटे खाडीपुल खड्डेमय झाला आहे. पावसाच्या पाण्यात खड्डे दिसत नसल्याने पुलावरील अपघातांची संख्या वाढली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
खोपटे खाडीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधल्याने उरण तालुक्याचे पूर्व व पश्चिम भाग जोडले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही विभागातील जनतेचे दळणवळणाचे अंतर कमी झाले आहे. नोकरी, धंद्यानिमित्त उरण, जेएनपीटी विभागात जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ खोपटे खाडीपुलावरून वाढली आहे. त्याचबरोबर खोपटे-कोप्रोली विभागातील कंटेनर यार्ड्समध्ये ये-जा करणारी अवजड वाहनेही याच पुलावरून प्रवास करतात. मात्र, सध्या या पूलावर खड्डे पडल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. या खड्ड्यांना चुकवीत प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी आणि पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता तेथील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात आले.
या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवावेत. या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल, असे माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी सांगितले.
























































