ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू; चार दिवसांतील दुसरी घटना

सोलापूर शहरात अपघाताचे सत्र सुरूच असून, अशोक चौक परिसरात ट्रकखाली चिरडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून, त्याचे आजी-आजोबा गंभीर जखमी आहेत. गेल्या चार दिवसांतील ही दुसरी घटना असून, संभाजी महाराज चौकात चार दिवसांपूर्वी डम्परखाली चिरडून आई-वडिलांसमोरच एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.

असद अल्ताफ बागवान (वय 5) असे चिमुकल्याचे नाव असून, सरदार बागवान, मुमताज सरदार बागवान (रा. कर्जाळ, ता. अक्कलकोट) हे जखमी झाले आहेत.

सरदार बागवान हे पत्नी मुमताज आणि नातू असद यांच्यासह दुचाकीवरून निघालेले असताना अशोक चौक परिसरात एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात असद हा ट्रकच्या चाकाखाली सापडून चिरडला, तर त्याचे आजी-आजोबा बाजूला फेकले गेले. असदच्या अंगावरून गाडी गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याचे आजी-आजोबा गंभीर जखमी आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.