
सामना ऑनलाईन, मुंबई
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी परशुराम वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. परशुराम हा या प्रकरणात अटक करण्यात आलेला सहावा आरोपी आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने दावा केला आहे की गौरी लंकेश, कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांची हत्या एकाच पिस्तुलाने करण्यात आली आहे. फॉरेन्सिक अहवालात कॉम्रेड गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येसाठी एकच शस्त्र वापरल्याचे स्पष्ट झाले आहे असं तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. ज्या शस्त्राने तिघांची हत्या झाली ते शस्त्र मात्र अजून सापडले नसल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलंय. तपास अधिकाऱ्यांच्या या दाव्यामुळे लंकेश यांच्याच मारेकऱ्याने एम.एम. कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांची हत्या केलीय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या तिघांचीही हत्या एकाच पद्धतीने करण्यात आली होती.
तपास अधिकाऱ्यांनी गुप्ततेच्या अटीवर गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात काही माहिती उघड केली आहे. या माहितीनुसार गौरी यांची हत्या करणाऱ्या संघटनेचे जाळे देशातील ५ राज्यांमध्ये पसरलेले आहे. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये या संघटनेने हातपाय पसरले असल्याचं या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. या संघटनेचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातही असावेत असाही संशय तपास यंत्रणांना आहे. या हत्यांमध्ये हिंदू जनजागृती समिती किंवा सनातन या संस्थांचा थेट संबंध नाहीये मात्र या संस्थांचे लोकं या नव्या संघटनेत सामील झाल्याचाही संशय त्यांना आहे.


























































