
रत्नागिरीच्या खेडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज दुपारी कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली. चिपळूण-अंजनी स्थानकादरम्यान दगडमातीचा ढीग रेल्वे रुळावर कोसळला. त्यामुळे मुंबईहून मडगावकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड रेल्वे स्थानकामध्येच थांबवली गेली. गोव्याकडून मुंबईला जाणाऱया गाडय़ाही चिपळूण स्थानकात थांबवण्यात आल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे रुळावर आलेली माती आणि दगड काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आल्याने सायंकाळनंतर वाहतूक पूर्ववत करण्यास यश आले. दरम्यान, सावधगिरी म्हणून कोकण रेल्वेची तिकीटविक्री थांबवण्यात आली होती.
कोकणात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण रेल्वेमार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने दरडप्रवण भागांमध्ये तारांच्या संरक्षक जाळय़ा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षात कोकण रेल्वे मार्गावर माती आणि दगड कोसळण्याच्या प्रकारांना आळा बसला होता. यंदा बऱयाच कालावधीनंतर पहिल्याच टप्प्यातील पावसात माती खाली येण्याचा प्रकार घडला आहे. आज कोसळलेली दरड ही तारेच्या मजबुत जाळ्या तोडून रेल्वे रुळावर आली होती. सुदैवाने मोठी हानी झाली नाही. मात्र कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने कोकणात येणारे आणि कोकणातून मुंबई आणि अन्य शहरांमध्ये जाणाऱया प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दरड हटवण्याच्या कामासाठी खेडमध्ये रखडलेल्या मांडवी एक्प्रेसचे इंजिन घटनास्थळी नेण्यात आले होते अशी माहिती कोकण रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्गावरही ट्रफिक जॅम
मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड परशुराम घाटात पावसामुळे दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने गेले कित्येक दिवस हा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे महामार्गावर घाटाच्या दोन्ही बाजूला ट्रफिक जॅम झाले आहे. अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.



























































