विन्हेरे स्थानकात आठ तासांपासून मत्स्यगंधा एक्सप्रेस खोळंबली, अन्न पाण्याविना प्रवाशांचे प्रचंड हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल रेल्वे मार्गावर शनिवारी घसरलेल्या मालगाडीच्या अपघाताचे आफ्टरशॉक रविवारी बसले. या मार्गावरून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचे मात्र अतोनात हात झाले. महाड तालुक्यातील विन्हेरे रेल्वे स्थानकावर रविवार 1 ऑक्टोबर 2023 रोजी मत्स्यगंधा एक्सप्रेस जवळपास आठ तासांपासून खोळंबलेल्या अवस्थेत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळी 6 वाजल्यापासून जवळजवळ सहा तास या प्रवाशांना पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नव्हते तसेच त्यांची उपासमार झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. जवळपास दीड ते दोन हजार प्रवाशांना रेल्वेने वाऱ्यावर सोडून दिल्याचे संतापजनक चित्र होते.

स्थानिक नागरिक आणि सेवाभावी संघटनांनी पुढाकार घेऊन प्रवाशांसाठी पाणी, बिस्कीट, नाष्टा याची व्यवस्था केल्यामुळे मात्र प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय दूर झाली. याबाबत विन्हेरे रेल्वे प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रवाशांसाठी पाण्याची तसेच लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था केली असून पनवेल मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बससह खाजगी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु ही एक्सप्रेस रद्द झाली नसून पुढील सूचना आल्यानंतर ती मार्गस्थ होईल. तसेच हे ग्रामीण भागातील रिमोट स्टेशन असल्यामुळे इथे अन्य सुविधा उपलब्ध नसताना देखील आम्ही प्रवाशांसाठी शक्यतोपरी मदत करण्याचे सर्व प्रयत्न करीत आहोत.असे यावेळी विन्हेर रेल्वे स्थानक प्रशासनाकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले. कोकण रेल्वेच्या या प्रकाराने प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाल्याचे चित्र पाहावायास मिळाले.