बावनकुळे यांच्या दौऱयापूर्वीच भाजपमधील खदखद चव्हाटय़ावर

नवीन कार्यकारिणीत डावलण्यात आल्याने भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमधील रोष अजूनही कायम आहे. आजऱयातील कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाला कुलूपही ठोकले होते. या पार्श्वभूमीवर उद्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांच्या दौऱयावर येत असताना भाजपमधील खदखद चव्हाटय़ावर आली आहे.

जुन्या कार्यकर्त्यांनी माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरच निशाणा साधत गेल्या काही महिन्यांपासून भाजप पक्षात असलेली एक रचना संपलेली असून, चंद्रकांत पाटील यांनी काही लोकांना आमच्या डोक्यावर बसवल्याचा आरोप भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावेळी माजी संघटनमंत्री शिवाजी बुवा, अजितसिंह चव्हाण, भिकाजी जाधव, अनिल देसाई, एकनाथ पाटील, तानाजी कुरणे आदी उपस्थित होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष उद्या जिल्हा दौऱयावर येत आहेत. पण जिह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद वाढतच चालले आहेत. नवीन कार्यकारिणीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने गडहिंग्लज, आजरा, चंदगडमधील कार्यकर्त्यांमधील वाद समोर आला आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव सुरू आहे. जिह्याच्या संघटनात्मक रचना बदलल्या आहेत. नवीन कार्यकारणीत जुन्या लोकांचे स्थान नगण्य असून, पक्षाचे सभासद नसलेल्यांना पदाधिकारी बनवल्याचा आरोप बाबा देसाई यांनी केला आहे. त्यामुळे कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केल्याचे देसाई यांनी सांगितले.