
कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील करवीर तालुक्यातील पीरवाडी गावाच्या एका वळणावर शीतपेय घेऊन जाणारा कंटेनर उलटला. या अपघातात कंटेनरमधील दोघे गंभीर जखमी झाले. मात्र, परिसरातील नागरिकांसह येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांनी जखमींना मदत करण्याऐवजी शीतपेयांचे बॉक्स हडपण्यासाठी गर्दी केली होती. अवघ्या तासाभरात हा कंटेनर रिकामा झाला. दरम्यान, सोशल मीडियातून या लूटमारीचे व्हिडीओ व्हायरल होताच पोलीसही ‘ऍक्शन मोड’वर आले. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
गोव्याहून कोल्हापूरकडे शीतपेय घेऊन येताना हा कंटेनर पीरवाडी गावाजवळ पहाटे एका वळणावर उलटला. या अपघातात जखमी झालेल्या चालक व क्लीनरला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्याच्या कडेला कंटेनर उलटला. अंधार असल्याने पहाटेपर्यंत कोणाचे लक्ष गेले नाही; पण सकाळी ही बाब उघड होताच कंटेनरमधील शीतपेयांचे बॉक्स पळवायला आसपासच्या लोकांची सुरुवात झाली. काही दुचाकीचालकांनी तर आपल्या गाडीवर एकावर एक थर लावून बाटल्या पळविल्या. येणाऱ्या-जाणाऱ्या अनेक वाहनधारकांनी बॉक्सच्या बॉक्स पळविल्याने अवघ्या तासाभरात संपूर्ण कंटेनर रिकामा झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करवीर पोलिसांनी बाटल्या पळविणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.



























































