करोना रिपोर्टसाठी लागताहेत चार दिवस! कोल्हापुरात चाचण्यांचा भार पाच पटींनी वाढला; अनेक ठिकाणी स्वॅब घेणे बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
swab-test-corona-test
प्रातिनिधिक फोटो

 

कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवडय़ानंतर आता स्वॅब चाचणीचे संकट निर्माण झाले आहे. अनावश्यक कोरोना चाचण्यांचा भार आता क्षमतेपेक्षा पाचपटपर्यंत वाढल्याने त्याचा अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवाय क्षमतेपेक्षा अधिक स्वॅब येत असल्याने बहुतांश लॅबमध्ये नवीन स्वॅब घेणे बंद करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना याचा फटका बसत आहे. दरम्यान, पाहिजे तेवढे पैसे देऊन स्वॅब घेण्याची विनंती रुग्ण करताना दिसत आहेत.

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. त्यात सार्वजनिक व खासगी वाहतूक, चित्रीकरण, होम डिलिव्हरी, परीक्षा घेणारे, ऑनलाइन सर्व्हिस स्टाफसह बांधकाम व विविध उद्योगधंद्यांतील कामगार आदींना ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना चाचणीसाठी जिल्ह्यात 16 लॅब आहेत. ‘सीपीआर’अंतर्गत शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय शासकीय महाविद्यालय, इचलकरंजी येथील आयजीएम, गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय या शासकीय लॅबसह डी. वाय. पाटील, मृण्मयी, अंबिका या खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात येते. तर, पॅथक्युअर, कृष्णा अशा उर्वरित लॅबमधून स्वॅब गोळा करून ते पुणे, मुंबई येथील मोठय़ा लॅबमध्ये पाठविले जातात. सध्या अनावश्यक स्वॅबचा भार वाढल्याने या सर्वच लॅबमधून अहवाल देण्यास चार ते पाच दिवस लागत आहेत.

उशिरा येणाऱ्या अहवालाचे काय?

स्वॅब घेतल्यानंतर 48 तासांपर्यंत तपासणी केली तरच अचूक चाचणी होते, असे वैद्यकशास्त्रातील नियमावली सांगते. मात्र, सध्या सर्वत्र दुप्पट ते पाचपट स्वॅब जमा होत आहेत. त्यामुळे तीन ते चार दिवसांनंतर अहवाल मिळत आहेत. तोपर्यंत संबंधित रुग्णांची अवस्था अस्वस्थ करणारी आहे. उशिरा येणाऱ्या अहवालाची खात्री किती, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

तपासणी क्षमता वाढविणार – डॉ. विजय कुलकर्णी

जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज बाराशे ते पंधराशे स्वॅबची तपासणी होते. तर, शेंडा पार्क येथील ‘सीपीआर’अंतर्गत शासकीय लॅबची ‘आयसीएमआर’च्या गाइडलाइननुसार एक हजार 80 स्वॅबची दररोज तपासणी होते. 24 तासांत संबंधित चाचणी अहवाल देण्यात येतो. सध्या या लॅबच्या क्षमतेपेक्षा अधिक दोन हजारांहून अधिक स्वॅब चाचणीसाठी येत आहेत. त्यामुळे आता चाचणीक्षमता अडीच हजारांपर्यंत वाढविण्याची सूचना ‘आयसीएमआर’च्या संचालकांनी केल्याची माहिती डॉ. विजय कुलकर्णी यांनी दिली.

‘दररोजच्या तुलनेत स्वॅब चाचणी करणाऱ्यांची क्षमता पाचपट झाली आहे. अनावश्यक ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा हा परिणाम आहे. लॅबच्या क्षमतेच्या तुलनेत चाचण्यांची संख्या ही दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे येथून घेतलेले स्वॅब वेळेत जात असले, तरी मुंबईतील खासगी लॅबमधील तपासणीसाठी आलेल्या स्वॅबची संख्या पाहता, रिपोर्टसाठी तीन ते चार दिवसांचा विलंब लागत आहे. गेल्या आठवडय़ापासून ही परिस्थिती असून, आता तर काही लॅबनी स्वॅब घेणे बंद केले आहे. त्यामुळे स्वॅब गोळा करून पाठवायचे कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वप्निल भोसले, पॅथक्युअर लॅब, कोल्हापूर