
विधवा प्रथा बंद करण्याच्या दिशेने क्रांतिकारक पाऊल टाकणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याने विधवांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शिरोळ तालुक्यातील टाकळवाडी येथील मंदिराची वास्तुशांती विधवांच्या हस्ते करण्यात आली. ग्रामपंचायत पातळीवर केवळ ठराव न करता प्रत्यक्ष कृती करून कोल्हापूर जिल्ह्याने संपूर्ण राज्यापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
टाकळवाडी गावातील मंदिराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात विधवांना सन्मान देत त्यांच्या हस्ते देवीची ओटीभरणी आणि विधिवत पूजा करून घेण्यात आली. शोभा विठ्ठल निर्मळे, चंदाबाई आप्पासाहेब निर्मळे, रेशमा बजरंग निर्मळे आणि सरिता विलास निर्मळे या विधवा भगिनींनी ताई-बाईची पूजाअर्चा केली. गावात लवकरच विधवा प्रथाबंदीचाही ठराव मंजूर केला जाणार आहे.

























































