कोल्हापुरात ‘हनी ट्रॅप’ने व्यापाऱ्याला अडीच लाखांना लुटले, सहाजणांच्या टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका अल्पवयीन मुलीद्वारे शहरातील एका कापड व्यापाऱयाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून अडीच लाख रुपये उकळणाऱया सहाजणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. 15 दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. शनिवारी रात्री व्यापाऱयाने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून पोलिसांनी जांबियासह मोबाईल, दुचाकी असा सुमारे 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी टोळीचा सूत्रधार सागर पांडुरंग माने (वय 32, रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा) याच्यासह सोहेल उर्फ अरबाज मुनाफ वाटगी (वय 23, रा. जुना वाशीनाका), उमेश श्रीमंत साळुंखे (वय 23, रा. राजारामपुरी), आकाश मारुती माळी (वय 30, रा. यादवनगर), लुकमान शकील सोलापुरे (वय 27, रा. जवाहरनगर) आणि सौरव गणेश चांदणे (वय 23, रा.यादवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरातील कापड व्यापाऱयाला व्हॉट्सऍपवर मैत्री करण्याचा बहाणा करून संबंधित अल्पवयीन मुलगी भेटण्यासाठी फ्लॅटवर गेली होती. त्यानंतर तेथे आलेल्या सागर माने व साथीदारांनी व्यापाऱयाला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याचे अपहरण केले. पन्हाळा रोडवरील केर्ली गावाजवळ त्याला मारहाण केली. त्याच्या गाडीतील दीड लाख रुपये घेऊन तीन कोऱया चेकवर सह्या घेतल्या. बागल चौकातील फायनान्स कार्यालयात नेले. त्याच्या अंगावरील दागिने गहाण ठेवून 1 लाख रुपये घेतले. त्यानंतर वारंवार फोन करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दहा हजारांची मागणी करत होते.

संबंधित व्यापाऱयाने काल जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुह्यांचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी टोळीला जेरबंद करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना दिल्या होत्या. त्यानुसार जाधव यांनी आपल्या पथकाद्वारे टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यांचा आणखीन एक साथीदार विजय रामचंद्र गौंड (रा. कळंबा) व एक महिला यांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई कारवाई संजय पडवळ, पांडुरंग पाटील, अनिल पास्ते, कुमार पोतदार, रवींद्र कांबळे, प्रदीप पोवार, सुप्रिया कात्रट यांनी केली.

जिल्ह्यात हनी ट्रॅपचे जाळे

दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूरच्या एका साखर व्यापाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवून अडीच कोटी रुपये उकळल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणीसह टोळीला अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच कोल्हापुरातही ‘हनी ट्रॅप’चा असा प्रकार उघडकीस आला. येथेही पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या महिनाभरापूर्वी इचलकरंजी भागात दोन तरुणांनी आत्महत्या केल्या. यामध्येही ‘हनी ट्रॅप’चा दाट संशय आहे.