
कोरोनाप्रतिबंधक लसीचा तुटवडा त्यात उपलब्ध लसींचा डोस घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून, वादावादीचे प्रकार घडत आहेत. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. लस संपल्याने नागरिकांना हात हलवत परत फिरावे लागत आहे. तर, काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्याचे प्रकार दिसून येत आहेत.
कोल्हापूर जिह्यात लसींचा तुटवडा जाणवत असून, मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी लस मिळत आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी लस संपल्याचे फलक पाहावे लागत आहे. शहरात तर दुसऱया डोस घेणाऱयांनाच लस देण्यात येत आहे. तरीसुद्धा पहिला डोस घेणाऱयांनीही चक्क पहाटे चारपासूनच आपापल्या परिसरातील लसीकरण केंद्रासमोर रांगा लावल्याचे चित्र आहे.
लस घेण्यासाठी रांगेत उभे राहायचे. दहा वाजेपर्यंत उन्हात चटके सहन करायचे. लस संपली असल्याचे ऐकताच घरी जायचे. असा क्रमच महानगरपालिकेच्या आयसोलेशन लस केंद्रावरील आहे. तर, फिरंगाई लसीकरण केंद्रावर रांगाच लागल्याचे चित्र आहे. एकंदरीत लसीचा तुटवडा असल्याने नागरिक संताप व्यक्त करत परत जात असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन नोंदणी करणारे लस घेऊन जात आहेत. मात्र, अशी नोंदणी न करणाऱयांची निराशा होत आहे. आज सकाळी फुलेवाडी परिसरात नागरिकांच्या गोंधळामुळे पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्यात येत होते.
































































