शंभर खोके… संजय मंडलिक ओके! शिवसेनेची कोल्हापुरात निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासदार करण्यासाठी राबलेल्या शिवसैनिकांनाच भाडोत्री बोलणाऱ्या गद्दार संजय मंडलिक यांच्या विरोधात आज शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली. ऐतिहासिक बिंदू चौकात झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी ‘शंभर खोके… संजय मंडलिक ओके’च्या जोरदार घोषणा दिल्या.

दरम्यान, ‘शंभर खोके… भाडोत्री संजय मंडलिक ओके’ अशी गद्दार संजय मंडलिकांची टॅग लाइन शिवसैनिक घराघरांत पोहोचवतील. तसेच 2024 च्या निवडणुकीत कोल्हापूरची स्वाभिमानी जनता मंडलिक यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापूर जिल्ह्यातून देण्यात आलेल्या लाखो प्रतिज्ञापत्रातील चौदाशे ते पंधराशे प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याची तक्रार मुंबईतील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँचचे पथक बुधवारी कोल्हापुरात आले आहे. यावर गद्दार संजय मंडलिक यांनी टीका करताना शिवसैनिकांचा भाडोत्री असा उल्लेख केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज ऐतिहासिक बिंदू चौकात मंडलिकविरोधात निदर्शने केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कोल्हापुरातील शिवसैनिकांनी जीवाचे रान करून संजय मंडलिक यांना खासदार केले. गद्दार मंडलिक आता हे विसरले. ते स्वतः भाडोत्री खासदार झाले. त्यामुळे ‘शंभर खोके… भाडोत्री संजय मंडलिक ओके’, अशी गद्दार मंडलिक यांची टॅग लाइन शिवसैनिक घराघरांत पोहोचवतील, असा इशारा देण्यात आला.

जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, अमित भोसले, मंजित माने, धनाजी दळवी, महेश उत्तुरे, दीपक गौड, राहुल माळी, दिनेश साळोखे, राकेश माने, अक्षय ओतारी, वैभव जाधव, ओमकार पाटील, विनोद खोत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

मंडलिकांनी 2024 ची चिंता करावी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळालेले ‘मशाल’ चिन्ह सोशल मीडियाद्वारे तब्बल दोन कोटी लोकांपर्यंत पोहोचले. ही मिळणारी लोकप्रियता पाहून ‘मशाल’ चिन्ह मिळाल्याचा पोटशूळ गद्दारांना उठला आहे. ही गद्दारांच्या उताराची सुरुवात झाली आहे, असा हल्लाबोल जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला. शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ मिळणार नाही, असे म्हणणाऱ्या मंडलिकांनी आता 2024ची काळजी करावी, असा टोलाही त्यांनी हाणला.