
सामना ऑनलाईन। कोलकाता
जर आपल्या बँक खात्यात अचानक पैसे जमा होऊ लागले तर.. असा नुसता विचार जरी मनात आला तरी आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. पण तुमची आमची पैशांची ही कल्पना पश्चिम बंगालमध्ये मात्र प्रत्यक्षात उतरली आहे. येथील बर्धमान जिल्हयात एक दोन नाही तर चक्क दीडशे लोकांच्या खात्यात अचानक 2 हजारापासून 24 हजारापर्यंत रक्कम जमा झाली आहे. अचानक जमा झालेल्या या रकमेमुळे खातेधारक आनंदात असले तरी हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कæ दुसऱ्या कोणी जमा केलेत असा प्रश्न खातेधारकांना पडलाय.
प. बंगालमध्ये पूर्वेला बर्धमान जिल्हा आहे. तेथील कटवा भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील खातेदारकांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत. विशेष म्हणजे एकवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या दारिद्र्य रेषेखालील खातेदारकांच्या खात्यात हे पैसे जमा केले जात आहेत. अॅक्सिस बँकेतून एनईएफटीद्वारे दीडशेहून अधिक जणांच्या खात्यात 2 हजार रुपयांपासून 24 हजार रुपये जमा झाल्याचे बँकेचे व्यवस्थापक धर्मदास मंडल यांनी सांगितले आहे. 1 जानेवारी 2019 रोजी हे पैसे खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहे. हे पैसे कोण जमा करत आहे हे मात्र अद्यापपर्यंत कळालेले नाही. यामुळे खातेदारकांसह बँक कर्मचारीही चक्रावले आहेत. 2014 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारावेळी प्रत्येक देशवासीयांच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत हे आश्वासन पूर्ण झालेले नाहीये. 2019 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने त्यांनी आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते पैसे खात्यात जमा केले असावे अशी शक्यता येथील आमदार शाहनवाज हुसैन यांनी व्यक्त केली आहे. हे पैसे कोण जमा करतंय याबाबत बँकेलाही माहिती नाहीये, यामुळे या पैशाचा स्त्रोत काय हे शोधण्यासाठी पोलीस व अधिकारी यांची धावाधाव सुरू आहे.

























































