Kolkata Rape Case : बलात्कार करून डॉक्टर तरुणीची निर्घृणपणे केली हत्या; पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचून थरकाप उडेल

पश्चिम बंगालमध्ये बलात्कार करून डॉक्टर तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. आता त्या डॉक्टर तरुणीच्या शवविच्छेदनाचा थरकाप उडवणारा अहवाल समोर आला आहे. या अहवालातून तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे.

डॉक्टर तरुणीच्या  मृत्यूची वेळ पहाटे 3 ते 5 ही वेळ दिली आहे. तिच्या गुप्तांगावर गंभीर जखमा आणि रक्तस्त्रावाचे व्रण आढळले आहेत. पोट आणि मानेवर गंभीर जखमा आहेत. तिच्या डोळ्यांमध्ये चष्म्याचे तुकडे मिळाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. आरोपीच्या फोनमध्ये अश्लील व्हिडीओ सापडले होते, असे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर आरोपी पोलीस बॅरेकमध्ये जाऊन बसला होता. या प्रकरणी सीबीआय तपास करावा, या मागणीच्या याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आठवड्याभरात हे प्रकरणाचा छडा लावला नाही तर ते सीबीआयकडे सोपविण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. दरम्यान, सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी डॉक्टरांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. आंदोलक डॉक्टरांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने गृह मंत्रालयाकडे केली आहे.

कोलकाताच्या आरजी कर मेडीकल कॉलेज रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये गेल्या आठवड्यात शुक्रवारी सकाळी डॉक्टर तरुणीचा मृतदेह सापडला होता. ड्युटीवर असताना तिची हत्या झाली होती. ती चेस्ट मेडीसिन विभागात द्वितीय वर्षाची पीजीची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या घटनेचा तपास समाधानकारक झालेला नाही. त्यासाठी त्यांनी आंदोलन केले. डॉक्टर संघटनेने या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आरोपीचा रुग्णालय प्रशासनात दबदबा होता.