
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सावळी विहीर, सोनेवाडी एमआयडीसीला मंजुरी दिली. यावर गुरुवारी (दि. 30) संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन युवकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याला माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आक्षेप घेत माझ्यामुळे एमआयडीसी मंजूर झाली, असा दावा आज पत्रकार परिषदेत केला.
शिर्डी येथे शिर्डीला एमआयडीसी मंजूर झाली असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी (दि. 29) प्रसारमाध्यमांना दिल़ी त्यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने 2018 पासून सातत्याने पाठपुरावा केल्याचे फलित म्हणून एमआयडीसी झाल्याचा दावा केला, तर अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी आपण निवडणुकीत एमआयडीसी करण्याचा शब्द दिला होत़ा निवडून आल्यानंतर 2020 पासून सातत्याने आपण पाठपुरावा केला. महायुतीच्या सरकारमुळे एमआयडीसी मंजूर झाली असून, रोजगाराच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला चालना
मिळणार असल्याचे सांगत आपलाही दावा अधोरेखित केला.
दरम्यान, आज पत्रकार परिषद घेऊन विजय वहाडणे यांनी आपण 2018 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीन दिवसांची एमआयडीसी व्हावी, यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती. यावेळी सहा हजार युवकांनी सह्या केल्या होत्या. त्याच्या आधारे आपण सरकारकडे पाठपुरावा केला. चार महिन्यांपूर्वी मंत्री विखे पाटील आले असता, त्यांना मी ‘मला संस्थान नको, मला विधान परिषदेची आमदारकी नको, एमआयडीसी द्या,’ अशी मागणी केली होती. तेव्हा मी व माझ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे युवकांचे स्वप्न पूर्ण झाले. परंतु आज मात्र आपणच केल्याच्या बातम्या देऊन, फ्लेक्स लावून, जल्लोष करीत पेढे वाटून आनंद व्यक्त केला जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला. आता तर मतदारसंघातील प्रश्नांची यादी सरकारकडे पाठवायची, एखादा प्रश्न सुटला तर आम्हीच केले म्हणून सांगायचे, अशी टीकाही वहाडणे यांनी यावेळी प्रस्थापित नेत्यांवर केली.
राजकारण निवडणुकीपर्यंतच करा, एमआयडीसीला आडवे येऊ नका, श्रेय कोणीही घ्या, मात्र विकास होऊ द्या, राजकीय खेळापायी विकास खुंटू नये, हीच माझी व माझ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचे शेवटी वहाडणे यांनी म्हटले आहे. एकूणच दिवाळीनंतर कोपरगाव आणि राहाता तालुक्यांत एमआयडीसीच्या मुद्दय़ावर राजकीय फटाके फुटू लागले आहेत.
























































