
कोपरगावात नगरपालिका कार्यालयाशेजारील सार्वजनिक शौचालयासमोर असलेल्या मोकळय़ा जागेत भाजीबाजार भरतो. यामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त वातावरणात भाजीखरेदी करावी लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून, याबाबत कारवाई होत नाही किंवा भाजीविक्रेत्यांना समज देण्यात येत नाही.
कोपरगाव शहरात रोजच भाजीमंडईत भाजीपाला येत असतो. कोपरगावातील मूळ भाजीमंडई गुरुद्वारा रोड परिसरात आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी शेतकऱयांना तिथे बसू दिले जात नाही. शेतकऱयांना तहसील कार्यालयाजवळ असणाऱया पोस्ट कार्यालयालगत जागा दिली आहे. दुर्दैवाने काही भाजी व्यापारी येथे दुकान लावतात. रविवारी भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी असते, त्यामुळे या मध्यवर्ती भागात मोठी गर्दी होते. काही महिन्यांपूर्वी मोजक्या प्रमाणात असणाऱया या भाजीमंडईला आता मोठे स्वरूप आले आहे. मोकळे मैदान सोडून काही भाजीविक्रेते, शेतकरी रस्त्यावर दुकाने लावतात. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागतात.
आज या भाजीमंडईचा कहरच झाला. नगरपालिकेसमोर असलेल्या शौचालयाच्या दारातच भाजीपाला विक्री केला जात होता. परिसरात शौचालयाची दुर्गंधी असूनही खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच काही भाजीविक्रेते महावितरणच्या डीपीलगत विक्रीसाठी बसले होते. नगरपालिका प्रशासनाचे याकडे लक्ष का नाही? शहराच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? शौचालयालगत बसलेल्या विक्रेत्यांना कोण लगाम लावणार? असे सवाल उपस्थित होत आहेत.
कचऱयाचे ढीग, गटारी तुंबल्या
– शहरात जागोजागी कचऱयाचे ढीग पसरलेले दिसतात. अनेक गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांचे मोठय़ा प्रमाणावर साम्राज्य वाढले आहे. मुख्याधिकारी पाच आकडी पगार घेऊनही शहरात प्रभागात भेटी देत नाहीत, अशा नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. गेल्या दीड वर्षापासून प्रशासकराज आहे. त्यामुळे ना कोणाचा कोणाला पायपोस, ना नगरसेवकांना घेणे देणे, अशी शहराची स्थिती आहे.





























































