प्रकाश कांबळे
श्री गणेशाची नगरी असलेल्या सांगलीत ऐन पावसाळ्यात आणि गणेशोत्सवाच्या काळात कृष्णानदीची पाणीपातळी अतिशय कमी झाली असून, नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्यामुळे गणपती विसर्जन करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने ठिकठिकाणी जलकुंड ठेवली आहेत. परंतु, नदीतच श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची मानसिकता असल्याने सांगलीकर नागरिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दीड दिवसाच्या श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन कृष्णा नदीत केले. पण, अनेक मूर्ती पाणी नसल्याने उघडय़ावर पडल्या आहेत. अद्यापि सरकारकडून पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गणेश भक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या कृष्णा नदीमध्ये फक्त एक फूट पाणी असल्याने पाटबंधारे विभागाने कोयना धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाने करूनही पाणी सोडले जात नाही, त्यात या जिह्याकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली आहे. भविष्यात प्यायला पाणी मिळेल का? याची चिंता आतापासूनच अनेकांना लागली आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. साताऱ्याच्या पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पाटबंधारे विभाग काम करीत असल्याची ओरड होत आहे.
आज रात्री केवळ 1050 क्युसेकने पाणी सोडण्याचा आदेश पाटबंधारे विभागाने काढला आहे. हे पाणी सांगलीपर्यंत पोहोचण्यास किमान दोन-अडीच दिवसांचा कालावधी लागणार आहे. पाणी सोडण्याचा निर्णय यापूर्वीच झाला असता, तर गणेश मूर्तीचे विसर्जन आणि सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला असता. पण, राज्यातील मिंधे सरकारचे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष नसल्यानेच सांगलीकर नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काल दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले; पण त्या गणेश मूर्ती आता पाण्याबाहेर दिसू लागल्या आहेत.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात गणपतीच्या काळात दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णेत आता गणपतीबाप्पाची मूर्ती बुडेल इतकेही पाणी नाही, ही शोकांतिका आहे. कोयना धरणातून सोडलेले पाणी सांगलीत पोहोचल्याशिवाय मूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय अनेक गणेशभक्तांनी घेतला आहे.
कोरडय़ा तलावात मूर्ती ठेवून करणार आंदोलन
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मिंधे सरकारविरोधात वेगळे पाऊल उचलण्याचा निर्धार केला आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी जत भागातील वेगवेगळ्या तलावात सोडत नाही तोपर्यंत गणपतीचे विसर्जन करणार नाही. त्या कोरडय़ा पडलेल्या तलावातच सर्व मूर्ती मध्यभागी ठेवून आंदोलन करणार, असा इशारा येथील चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.