
सामना ऑनलाईन, बंगळुरू
गेल्या 18 दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेले राजकीय घडामोडींचे नाटय़ मंगळवारी अखेर संपले. विधानसभेत प्रदीर्घ चर्चेनंतर काँग्रेस-जेडीएस सरकार विरोधातील विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले. सरकारच्या बाजूने 99 आणि विरोधात 105 मते पडली आणि कुमारस्वामी सरकार कोसळले. 14 महिन्यांत एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. दरम्यान, भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाले असून विधिमंडळ नेते येडियुरप्पा गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे सांगण्यात आले.
गेले दोन दिवस कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू होती. दावे-प्रतिदावे काँग्रेस-जेडीएस आणि भाजपकडून केले जात होते. राज्यात राजकीय अस्थिरता होती. त्यामुळे कर्नाटकात जमावबंदी लागू करण्यात आली होती.
मतदानावेळी 17 बंडखोरांसह 20 आमदार अनुपस्थित
दिवसभराच्या चर्चेनंतर सायंकाळी 7.30 वाजता विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी विश्वासदर्शक ठराव मतदानासाठी मांडला. या वेळी 17 बंडखोर आमदार अनुपस्थित होते. तसेच बसपा 1 आणि अपक्ष 2 असे 20 आमदार अनुपस्थितीत राहिले. त्यामुळे 224 सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा 103वर आला. मतदानानंतर काँग्रेस-जेडीएस सरकारच्या बाजूने 99 मते मिळाली तर भाजपच्या बाजूने 105 मते पडली. बहुमतासाठीचे संख्याबळ नसल्यामुळे कुमारस्वामी सरकार कोसळले. सरकारचा पराभव होताच कुमारस्वामी सभागृहाबाहेर पडले. रात्री 9.15च्या सुमारास राजभवनावर जाऊन राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.
भाजपचा जल्लोष
विश्वासदर्शक ठरावानंतर पक्षाचे नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्यासह भाजपच्या आमदारांनी व्हिक्टरी अशी खूण करीत आनंद व्यक्त केला. विधान भवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बंगळुरूसह राज्यात अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटण्यात आले.
बसपा आमदाराची हकालपट्टी
कर्नाटकातील बसपाचे एकमेव आमदार एन. महेश यांना सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश पक्षाध्यक्षा मायावती यांनी दिले होते. मात्र महेश आज सभागृहात गैरहजर राहिले. त्यामुळे मायावती यांनी त्यांची थेट पक्षातूनच हकालपट्टी केली.
हा लोकशाहीचा विजय – येडियुरप्पा
14 महिन्यांच्या काँग्रेस-जेडीएस सरकारला कर्नाटकातील जनता कंटाळली होती. राज्याचा विकास ठप्प झाला होता. कुमारस्वामी सरकार कोसळले हा कर्माचा खेळ आहे. आज लोकशाहीचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी दिली. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर विकासाला गती देऊ. भाजप सरकार शेतकऱ्यांचे असेल, असे ते म्हणाले.
भाजपने आमदारांना लाच दिली – सिद्धरामय्या
मागच्या दाराने भाजप सत्तेवर येत आहे. त्यासाठी भाजपने आमदारांना लाच दिली. 20 कोटी, 30 कोटी रुपयांचे आमिष आमदारांना दाखवण्यात आले. एवढा पैसा आला कोठून, असा सवाल काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केला आहे. आमदारांचे राजीनामे म्हणजे भाजपचे ‘होलसेल ट्रेड’ आहे, असे ते म्हणाले.
राजकारण हे माझे क्षेत्र नाही. माझे क्षेत्र चित्रपट आहे. मी सिने निर्माता आहे. मात्र, अपघाताने राजकारणात आलो आणि अपघातानेच मुख्यमंत्री झालो. सत्ता कधीही कायमस्वरूपी राहत नाही हेच खरे-कुमारस्वामी

























































