कुर्ला क्रांतीनगर-रेल्वे वसाहत रहिवाशांची पायपीट थांबणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला क्रांतीनगर, साबळेनगर, संतोषीमाता नगर, रेल्वे वसाहत येथील रहिवाशांसाठी सांताक्रुझ-कुर्ला जोडरस्ता पुलावरून खाली उतरण्याकरिता लवकरच पादचारी पूल बांधण्यात येणार आहे.

आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांच्या पाठपुराव्यातून या कामासाठी 1 कोटी 29 लाखांचा निधी पालिकेकडून मंजूर झाला आहे. या कामामुळे संबंधित परिसरातील रहिवाशांची पायपीट थांबणार आहे.

क्रांतीनगर, साबळेनगर, संतोषीमाता नगर, रेल्वे वसाहत येथील रहिवाशांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वळसा घालून जावे लागत होते. याची दखल घेत सांताक्रुझ कुर्ला जोडरस्ता पुलावरून खाली उतरण्याकरिता पादचारी पूल बांधावा यासाठी शिवसेना नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी पाठपुरावा केला.

या पार्श्वभूमीवर संबंधित कामासाठी पालिकेने 1 कोटी 29 लाख 42 हजार 125 रुपये मंजूर केले आहेत. हे काम रेल्वेच्या हद्दीत येत असल्याने या कामासाठी पालिकेने हा निधी रेल्वे खात्याकडे वर्ग केला आहे. रेल्वे प्रशासनाकडून या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाणार असून काम पूर्ण केले जाणार आहे.