कुर्ल्याचा यूटय़ूबर अभिनव निघाला घरफोडय़ा, चोरीच्या पैशांतून मौजमजा करत बनवले व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूटय़ूबर म्हणून मिरविणारा एक सराईत चोरटा जेरबंद झाला आहे. बंद घरात हातसफाई केल्यानंतर वेगवेगळय़ा ठिकाणी जाऊन मौजमजा करायची, त्या ठिकाणचे व्हिडीओ बनवून ते यूटय़ूबवर अपलोड करायचे, पैसा संपला की पुन्हा बंद घरे शोधायची. जिवाची मुंबई करण्यासाठी घरफोडय़ा करणाऱ्या यूटय़ूबरच्या विनोबा भावे नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अभिनव गुप्ता (26) असे त्याचे नाव आहे.

कुर्ला पश्चिमेकडील ख्रिश्चन गावात 18 मे रोजी घरफोडीची घटना घडली होती. चोरटय़ाने बंद घरातील 25 तोळे सोन्याचे व दीड किलो चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पद्माकर पाटील व पथकाने गुह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी व्ही. बी. नगर, कुर्ला, टिळकनगर, नेहरूनगर, वाकोला परिसरातील जवळपास 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून घरफोडी करणाऱ्या आरोपीची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

अभिनव गुप्ता या रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराचे हे कृत्य असून तो नेहरूनगर, वाकोला, दिवा आदी ठिकाणी असतो असे समजताच पाटील व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन गुप्ताचा शोध घेतला. शोधाशोध सुरू असतानाच गुरुवारी तो कुर्ला येथील किरोळ रोड परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचला असता अभिनव गुप्ता मिळून आला. अभिनवला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे, दीड किलो चांदी, 14 मोबाईल फोन, विदेशी चलनी नोटा, दोन लॅपटॉप व बनावट दागिने मिळून आले. हा सर्व मुद्देमाल त्याने तो ज्या गाडीतून किरोळ रोड येथे आला त्या गाडीत लपवलेला होता. विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात दाखल चार गुह्यांत अभिनवचा सहभाग आढळून आला आहे. त्याने मुंबई तसेच ठाणे, नवी मुंबई येथेदेखील घरफोडय़ा केल्या आहेत.

बारावीपर्यंत शिकलेल्या अभिनवला आधीपासून चोरीची सवय आहे. वेगवेगळय़ा ठिकाणी फिरायला जायचे, मैत्रिणींवर पैसे उडवायचे, मित्रांसोबत मौजमजा करायची अशी छानछोकी तो करतो. यासाठी पैसा लागत असल्याने त्यासाठी तो चोऱया करतो. वॉचमन नसलेल्या इमारतींमधील बंद घरे तो शोधतो. मग रात्रीच्या वेळेस शिताफीने ती बंद घरे फोडून दागिने, रोकड, किमती ऐवज चोरतो. एकटाच घरफोडय़ा करणारा अभिनव चोरीच्या पैशांवर हायफाय राहतो.