
सामना ऑनलाईन । पणजी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. सामान्य जनतेपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांनाच बाळासाहेबांच्या आयुष्यावरील हा चित्रपट पाहण्याचा मोह आवरत नाहीये. मंगळवारी भाजपचे ज्येष्ट नेते लालकृष्ण आडवाणी यांनी गोव्यातील सिनेमागृहात जाऊन ‘ठाकरे’ हा चित्रपट पाहिला.
लालकृष्ण आडवाणी हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत सध्या गोव्याला आले आहेत. राजभवनात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी आडवाणी हे त्यांची मुलगी प्रतिभा आडवाणी आणि गोव्याच्या गव्हर्नर मृदुला सिन्हा यांच्यासोबत ‘ठाकरे’ हा चित्रपट पाहायला गेले होते. पणजीतील मल्टिप्लिक्समध्ये रात्री सव्वा नऊचा शो त्यांनी पाहिला. आडवाणी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी या सिनेमागृहातील एक संपूर्ण रांग बुक करण्यात आली होती. आडवाणी चित्रपट पाहायला आल्याने त्या सिनेमागृहाची सुरक्षा देखील वाढविण्यात आली होती.






















































