
मंगळवारी सकाळी राहत्या घरात मुलीला गळफास लावून स्वतःही गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या भूपेश पवार यांनी दोघांच्याही मृत्यूस पत्नीला जबाबदार धरले आहे. भूपेशने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तसे नमूद केले आहे. त्यामुळे काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात कलम 306 घेतले आहे.
गणेशगल्लीतल्या विमावाला महल इमारतीत राहणाऱ्या भूपेश पवार यांनी मंगळवारी सकाळी त्यांची 11 वर्षांची मुलगी आर्या हिला गळफास लावून मग स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. काळाचौकी पोलिसांना घटनास्थळी दोन पानांची चिठ्ठी तसेच जवळपास साडेनऊ लाखांची रोकड, दागिने सापडले. चिठ्ठी 20 तारखेलाच लिहिलेली होती आणि चिठ्ठीत या घटनेला पत्नी तसेच अन्य व्यक्ती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शिवाय पैसे व दागिने कुठकुठल्या नातेवाईकांना द्यायचेत तेदेखील नमूद केले आहे. माझ्यानंतर मुलीचा सांभाळ होणार नाही अशी शंकादेखील व्यक्त केली आहे. यावरून मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या करायचे भूपेश याने आधीच ठरवले होते आणि 25 एप्रिलला त्याने ते कृतीत उतरवले असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

























































