दिल्ली, पाटणासह 9 ठिकाणी सीबीआयचे छापे; लालूंचे निकटवर्तीय प्रेमचंद गुप्तांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमीन-नोकरी घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा ‘राजद’च्या लालू यादव यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी सुरू आहे. या प्रकरणी सीबीआयने दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि पाटणासह नऊ ठिकाणी छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय आरजेडी आमदार किरण देवी आणि आरजेडीचे माजी आमदार अरुण यादव यांच्या निवासासह पाटणा आणि आराहमधील अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.

लालूंच्या निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या प्रेमचंद गुप्ता यांच्या नोएडा, दिल्ली आणि गुरुग्राममधील ठिकाणांवरही सीबीआयचे छापे पडत आहेत. सीबीआयचे पथक मंगळवारी सकाळी आरजेडी आमदार किरण देवी आणि माजी आमदार अरुण यादव यांच्या निवासस्थानी आगियाओन (आरा) येथे पोहोचले आणि सीबीआयचे पथक पाटणा येथे छापे टाकत आहे.

लालूंच्या निकटवर्तीय अरुण यादव यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. किरण देवी या संदेश विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि त्यांचे पती अरुण यादव यांची बाहुबली अशी प्रतिमा आहे. किरण देवी या लालू यादव यांच्या जवळच्या आमदारांपैकी एक मानल्या जातात. अरुण यादव हे राजदचे अध्यक्ष लालू यादव यांच्याही जवळचे आहेत. अरुण यादव गेल्या वर्षी अल्पवयीन बलात्कार प्रकरणात अडकला होता आणि त्याला शरण जावे लागले होते. मात्र, पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. प्रेमचंद गुप्ता हेही लालूंच्या जवळचे आहेत.