
येथील पंचगंगा नदीपात्रात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाची मोठय़ा प्रमाणात जलपर्णी (केंदाळ) वाढले आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. याची दखल घेत महापालिका आयुक्तांच्या आदेशाने पालिका कर्मचाऱयांनी जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी औषध फवारणी करून जलपर्णी नष्ट करण्याचा प्रयत्न अंगलट आल्यामुळे आता कर्मचाऱयांच्या मदतीने केंदाळ काढले जात आहे.
प्रदूषणामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे. प्रक्रियेविना सांडपाणी, मैलायुक्त पाणी आणि औद्योगिक केमिकलयुक्त सांडपाणी पंचगंगेत सोडले जाते. त्यामुळे इचलकरंजीकरांना 18 कि.मी.वरून कृष्णा नदीतून आणलेल्या पाण्यावर राहावे लागते आहे.
इचलकरंजीतील केंदाळ नागरिकांचे सहकार्य घेऊन काढली जाते; पण सध्या याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. केंदाळ वेगाने वाढणारी वनस्पती आहे. जलपर्णी वाढत असताना प्रचंड पाणी शोषून घेते. गतवर्षी प्रथम आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ड्रोनच्या साहाय्याने जलपर्णीवर औषध फवारणी करून ही वनस्पती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पर्यावरणवाद्यांनी याला आक्षेप घेतला आणि पिण्याचे पाणी आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करून प्रांत कार्यालयात खटला दाखल केला. हा अनुभव लक्षात घेऊन यंदा मनपा प्रशासनाने मानवी श्रमातून वनस्पती काढण्यास आरंभ केला आहे. मनपा कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने जलपर्णी काढण्यात येत आहे. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनीही आज जलपर्णी काढण्याच्या कामाची पाहणी केली. विशेष म्हणजे या कामात नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.



























































