
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनावेळी लतादीदी अवघ्या 12 वर्षांच्या होत्या. आपल्या छोटय़ाशा खांद्यांवर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. लतादीदींनी 1942 साली पहिलं गाणं ‘किती हसाल’ या चित्रपटासाठी गायलं, मात्र चित्रपटाची लांबी कमी करण्यासाठी ते हटवण्यात आले. पार्श्वगायनाला सुरुवात करण्यापूर्वी काही चित्रपटांत त्यांनी छोटय़ा-छोटय़ा भूमिका साकारल्या. नवयुग चित्रच्या ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी काम केले. यातील ‘नटली चैत्राची नवलाई’ हे गाणे देखील त्यांनी गायले होते. 1943 साली ‘माझे बाळ’ या चित्रपटातील अनाथशाळेच्या एका दृश्यात लतादीदींसोबत तिन्ही बहिणींनी छोटीशी भूमिका साकारली होती तसेच त्यांनी ‘चला चला नवबाला’ हे गीत गायले होते.
गायकांच्या रॉयल्टीसाठी उठवला आवाज
1960च्या दशकात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला होता. लता आणि रफी चार वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते. हा वाद रॉयल्टीवरून निर्माण झाला होता. लता मंगेशकर यांचे म्हणणे होते की, संगीतकारांसारखी गायकांनाही गाण्याची रॉयल्टी मिळायला हवी. पण रफी यांचे यावरील मत विरुद्ध होते. पुढे दीदी आणि रफीसाहेब यांच्यात तात्विक मतभेद होऊन रफीसाहेबांबरोबर गायचे नाही, असे दीदींनी ठरवले होते. हा अबोला चार वर्षे होता. कालांतराने त्यांच्यामध्ये पुन्हा सख्य निर्माण झाले. वाद अतिशय सहजपणे मिटला आणि अनेक सुंदर युगलगीतं रसिकांना ऐकायला मिळाली.



























































