लेथ जोशी : यंत्रमुग्ध जगण्याचा अनुभव

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे

प्रत्येक माणसाने स्वत:भोवती एक मिती आखून घेतलेली असते. त्याचं स्वत:चं असं एक अवकाश असतं आणि त्यात तो सुखाने राहात असतो. पण जेव्हा कधी तरी त्याच्या त्या सुरक्षित मितीचे बंध तुटतात तेव्हा त्याचं मन सैरभैर होतं. अचानक उघडं पडल्यासारखं होतं. आपण नक्की काय करायचं, कुठे जायचं हे त्याला समजतच नाही. मितीबाहेरचं जग कमालीचं बदललेलं असतं आणि त्या आपल्या सुरक्षित कोशात वावरणारा तो त्या सगळय़ा बदलांशी अनभिज्ञ असतो. अर्थात नवं जग बदलणारं नसतं, बदलण्याची गरज त्याला असते. या वेगाशी जुळवून घेता आलं तर ठीक नाही तर, हळूहळू तो पुन्हा स्वत:भोवती कोश विणून घेतो आणि स्वत:पुरतं स्वत:ला मिटून घेतो.

गिरण्या बंद पडल्या, टाळेबंदी झाली त्यानंतर घराच्या ओसरीवर विडी फुंकत भकासपणे आयुष्य जगणारे अनेकजण आपल्या पाहण्यात आले असतील. ‘लेथ जोशी’ हा सिनेमा अशा माणसांवर, किंबहुना समाजात सातत्याने बदलणाऱ्या मितीच्या मधल्या कचाटय़ात सापडणाऱ्यांवर भाष्य करतो. अनेक वर्ष ‘लेथ मशीन’वर काम करून त्या मशीनशी अक्षरशŠ सहचाऱ्याइतकं जवळचं नातं जुळलं असताना अचानक त्याची नोकरी जाते. लेथ मशीनशिवाय आपण नवीन काय करू शकतो किंबहुना काहीच करू शकत नाही या जाणिवेने तो घेरला जातो आणि मग नव्या जगाशी जुळवून घेण्याचा त्याचा प्रवास सुरू होतो. या नव्या-जुन्याच्या द्वंद्वात तो नक्की काय करतो याची कथा म्हणजे ‘लेथ जोशी’ हा सिनेमा.

अत्यंत विचारपूर्वक लिहिलेल्या कथेवर लिहिली गेलेली प्रभावी पटकथा, उगाच फाफटपसारा न मांडणारे नेमके संवाद, त्याला मिळालेली संगीत, छायांकन, ध्वनी, संकलन, कलादिग्दर्शन इत्यादी बाबींमधनं कथेला मिळालेला योग्य उठाव आणि या सगळय़ाला मिळालेली उत्कृष्ट अभिनयाची जोड आणि या सर्वावर चढलेला संयत दिग्दर्शनाचा साज म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर ‘लेथ जोशी’ हा सिनेमा पाहावा.

सिनेमाच्या सुरुवातीला कुठच्याही ध्वनीशिवाय लेथ मशीन जोडण्याचं दृश्य पडद्यावर येतं आणि ते मशीन सुरू होतं तसा सिनेमा सुरू होतो आणि मग हळूहळू एकेक गोष्ट उलगडायला लागते. ही कथा वेगळी का आहे, कारण यात कुठेही अतिरंजितपणा नाही, आकरण नाटय़ नाही, संवादांचा गोंगाट नाही, ग्लॅमर नाही की भव्य लोकेशन्स नाहीत. पण तरीही रोजचं जगणं आणि त्यातले छोटे छोटे पैलू इतक्या खऱ्या पद्धतीने मांडले आहेत की ते खरेपणच आपल्या मनात जास्त झिरपतं. सर्वसामान्यांच्या आयुष्यातही काही स्वप्ने असतात, त्यांचीही काही ध्येये असतात. छोटय़ा छोटय़ा गोष्टीतनं मिळणारा आनंद, कौटुंबिक नर्मविनोद, दहा बाय दहाच्या छोटय़ाशा घरातला सवयीचा संसार, दुःखं, आणि दुखणी. या घरांमध्येही आपापसांत कुरबुरी असल्या तरीही घरातली प्रत्येक नाती एकमेकांशी अगदी एकरूप झालेली असतात. अशाच अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी आपल्याला ‘लेथ जोशी’ या सिनेमात अनुभवायला मिळतात.

माणूस आणि मशीन्स हा विचार मध्यवर्ती ठेवून या सिनेमाची बांधणी केली आहे. आजच्या जगात माणसांची जागा मशीन्स घ्यायला लागली आहेत. त्यामुळे जुन्या कामगारांना कमी केलं जातं. नवं तंत्रज्ञान जाणणाऱ्यांना आणि यंत्रांना प्राधान्य दिलं जातं. एकेकाळी वर्तमानपत्रासारख्या दररोज नेमाने दिसणाऱ्या त्या जुन्या कामगाराला नंतर कोपऱ्यात पडलेल्या रद्दीचा भाव येतो. नेमकं काय होतं त्याचं, त्याच्या मनात काय सुरू असतं, नव्याने जगायची ठिणगी याच्यातही कधी पडते का अशा अनेक गोष्टींचा तरल उलगडा ‘लेथ जोशी’ या सिनेमात पाहायला मिळतो.

जास्त न बोलणाऱ्या आणि जे सुरू आहे ते चुपचाप स्वीकारत आपल्यापरीने खटपट करणाऱ्या लेथ जोशीला चित्तरंजन गिरी या कलाकाराने अगदी नेमकेपणाने साकारलंय. आपला मुलगा, बायको, नव्या पिढीचे मालक या सगळय़ांकडनं तो मागे पडल्याची भावना निमूटपणे ऐकत असताना जेव्हा जुने मालक त्याला लेथ जोशी म्हणून संबोधतात तेव्हा त्याच्या निर्विकार चेहऱ्यावर उमटणारं समाधानाचं हास्य, माझं मशीन हे पटवून देताना दोनच वाक्यांमध्ये जाणंवणारी कळकळ, आई गेल्यावर आणि स्वत:चं इतक्या वर्षांचं मशीन गेल्यावर त्याच्या नजरेत उमटणारी सुक्ष्म वेदना या सगळय़ा गोष्टी या कलाकाराने कमालीच्या ताकदीने साकारल्या आहेत. त्याची बायको झालेली आश्विनी गिरीही अप्रतिम. नव्याची कास धरणारी, बेसनाच्या वडय़ा आणि उकडीचे मोदक बनवून डबे पोचवणारी ती जेव्हा बदलत्या गरजेप्रमाणे चायनीज् बनवायला घेते तेव्हा याच प्रवाहातल्या वेगळय़ा विचारधारेचीही ओळख होते. जिवंत राहाणं आणि जीवन जगणं या दोन्हीतला फरक लेथ जोशी आणि त्याची बायको यांच्यातल्या फरकाकडे पाहताना जाणवते. ओम भुतकर या कलाकाराचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आपल्या सहज अभिनयाचा छाप तो सोडतोच. नव्या पिढीचा तरीही आपल्या कुटुंबाला धरून ठेवणारा हा खटपटय़ा मुलगाही आपल्याला आपल्या आणि आजूबाजूच्या घरात पाहिल्यासारखाच वाटतो. सेवा चौहान यांनी साकारलेली आजीही मस्तच. तिचं आणि नातवाचं सहज नातं. सासू सुनेचं मुरलेलं नातं अप्रतिम उभं राहिलंय.

या सिनेमातला आणखी एक भाग म्हणजे मशीनचा. मग ते लेथ मशीन असो, मुलाच्या खोलीतील संगणक असो, अलार्मचं घडय़ाळ, खरखरणारा टेबल फॅन, शिवणाचं मशीन, पाटावरवंटय़ाची जागा घेणारं फूड प्रोसेसर, नॅनो गाडी, सायकल, वर्कशॉपमधल्या चहाच्या मशीनमधला चहा किंवा आजारी माणसाचं मशीनच्या आधारे जगणं असो… कॅमेरा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या सिनेमातल्या प्रत्येक मशीनचा वेध घेतो आणि माणसांइतकंच त्या मशीनचं सर्वव्यापी अस्तित्व ठळकपणे आपल्या मनावर बिंबवतो. जुन्या काळातही मशीन्स होती… लेथ मशीन होतं, अलार्मची घडय़ाळं होती, पुरण काढायला पुरणपात्र होतं, चालवायला सायकल होती, चहा शेगडीवर बनायचा… ही सर्व एकाअर्थी मशीन्सच. पण काळासोबत ती सर्वसामान्य माणसांसारखीच झाली. इतकी की कधी काळी या माणसांमुळे आणि या यंत्रामुळे आपलं आयुष्य चालत होतं याचा विसर पडायला लागला. काळासोबत धावताना स्वत:ला पुढे ठेवायची गरज हे सगळं कुठेही स्पष्टपणे संभाषणातून किंवा स्वगतातून व्यक्त न करताही मांडलं गेलंय आणि ते अप्रतिम आहे. शांततेत खरे आवाज शोधत दिलेला प्रभाव खरोखर प्रभावी.

‘लेथ जोशी’ हा सिनेमा म्हणजे अनुभव आहे. सिनेमा पाहताना जाणवेल की हा अनुभव आपल्या आजूबाजूचा किंवा आपल्याच घरातला आहे. हा बदलत्या काळाचा वेधदेखील आहे. फार काही प्रत्यक्ष न बोलताही ठसवलेली वास्तवता म्हणजे हा सिनेमा आहे. असे सिनेमे नक्की पाहावेत. नाटय़, कोलाहल, अचकट विचकट विनोद, आयटम साँग अशा कुठच्याही शिदोरीशिवाय प्रत्येक धागा नीट बांधल्यावर सिनेमा कसा मनात खोलवर रुजू शकतो हे ‘लेथ जोशी’ बघितल्यावर नक्कीच जाणवेल.

दर्जा    **** चित्रपट     लेथ जोशी निर्माता    सोनाली जोशी, मंगेश जोशी लेखन दिग्दर्शन मंगेश जोशी

कॅमेरामन   सत्यजित श्रीराम पार्श्वसंगीत   सारंग कुलकर्णी कलाकार चित्तरंजन गिरी, आश्विनी गिरी, अजित अभ्यंकर, सेवा चौहान, ओम भुतकर.