
मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्याने आत्महत्या केली आहे. अहमदपूर येथे त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवार सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. महेश बाबुराव कदम (वय 26) असे या युवकाचे नाव असून ते ढाळेगाव ग्रामपंचायतीचे सदस्यही होते.
शुक्रवारी दुपारी महेश कदम हे त्यांच्या शेतात गेले. नापिकीमुळे ते निराश झाले होते त्यात मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून त्यांनी दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही अशी चिठ्ठी लिहून त्यांनी विष घेतले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अहमदपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना आज (शनिवार) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या ढाळेगाव या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते.


























































