
सामना प्रतिनिधी। लातूर
शहरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण हिसकावण्याचे प्रमाण वाढत आहे. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पटेल नगर येथे एका युवकास ताब्यात घेतले. तिघांनी मिळून गंठण चोरीचा गुन्हा केल्याची कबूली दिली असून त्यात एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
शहरातील नारायण नगर भागातील आश्विनी अतुल प्रयाग यांचे 3 जानेवारी रोजी गळ्यातील तीन तोळ्याचे गंठण हिसकावून मोटारसायकल स्वार पळून गेले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी सागर उर्फ टिल्लू भगवान सोनवणे (19) रा. पटेल चौक यास ताब्यात घेतले. त्याने गंठण हिसकावल्याची कबुली दिली. त्याच्यासोबत प्रकाश नारायण गिरी (27) रा. एलआयसी कॉलनी लातूर व अल्पवयीन साथीदार असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे गंठण जप्त करण्यात आले आहे. त्यांचे इतर साथीदार असल्याचे सांगुन शहरात अनेक गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली.
यासाठी सहायक पोलीस निरीक्षक आर.आर. तरकसे, कर्मचारी वहीद शेख, भिमराव बेल्लाळे, माधव बिलापट्टे, गोविंद चामे, दत्तात्रय शिंदे, तुकाराम माने यांनी परिश्रम घेतले.































































