
सामना प्रतिनिधी। लातूर
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना उदगीर शहरातील आनंद नगर भागात घडली. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात महिलेच्या वडिलांनी केलेल्या फिर्यादीवरुन सुरेश भगवान चवळे याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनिषा असे मृत महिलेचे नाव आहे.
मनिषाचा विवाह चाकूर तालूक्यातील चवळेवाडी येथील सुरेश भगवान चवळे याच्यासोबत 18 मे 2013 रोजी झालेला होता. 2014 मध्ये तिला एक मुलगी झाली, त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सुरेश तिला मारहाण करीत होता. 9 मार्च रोजी दुपारी मनिषाने तिला सुरेश मारहाण करीत असल्याची माहिती आईला दिली होती. त्यानंतर 10 तारखेच्या रात्री 3.18 च्या सुमारास सुरेशच्या मोबाईलवरुन एका महिलेचा मनिषाच्या आईला फोन आला आणि तिने तुमची मुलगी बेशुद्द पडल्याचे सांगितले व तिला दवाखान्यात नेत असल्याचे कळवले. उदगीर येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचे सांगितले. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मुलीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे सुरेश भगवान चवळे यानेच तिचा गळा दाबून खून केला असल्याची तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
































































