
अभय मिरजकर, लातूर
येथील खासगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण याच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा लातूर जिल्हा वडार समाज संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, २५ जून रोजी वडार समाजातील अविनाश चव्हाण याचा लातुरात गोळ्या घालून खून करण्यात आला. हा खून करणारे सवर्ण व आर्थिक प्रबळता असलेले आहेत. या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी. लातुरातील स्थानिक सरकारी वकील न देता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. जलद निकाल येण्यासाठी विशेष न्यायालयाची नेमणूक करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर पप्पू धोत्रे, सुभाष शिंदे, अर्जुन धोत्रे, माणिक हुलगुंडे, संजय शिंदे, शंकर इटकर, बाबासाहेब धोत्रे, नागनाथ मिरजे, दिलीप धोत्रे व इतरांचा समावेश होता. लातूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले आहे.


























































