कायदा व सुव्यवस्था कोलमडली, उपराजधानीत १०० दिवसात ६३ खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । नागपूर

राज्याच्या उपराजधानीत १०० दिवसात ६३ खून होतात. धुळे व मालेगाव येथील हत्याकांडात निष्पाप लोकांचे जीव गेले आहे. यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

खासदार अशोक चव्हाण आज नागपुरातील दाखल झाले व विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली. विधान परिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार उद्या, गुरुवारला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी त्यांनी कॉंग्रेसच्या आमदारांशी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर कोरडे ओढले. मुख्यमंत्री स्वतः नागपूर शहरातील असून सुद्धा पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक दिसत नाही. त्यामुळे राज्याच्या राजधानीसोबत उपराजधानीही गुन्हेगारांच्या विळख्यात सापडली असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामात राज्यातील केवळ १८ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले असून यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था व शेतकऱ्यांची पीक कर्ज या मुद्यांवर पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरले जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.