कशेडी बोगद्यात आठ ठिकाणी गळती सुरू! गळती थांबवण्यासाठी लावले पत्रे, जिओलॉजिकल तज्ञांकडून पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kashedi-tunnel

>> उमेश खेडेकर

मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणवासीयांचे स्वप्न ठरलेल्या कशेडी बोगद्याला एक-दोन नव्हे तर आठ ते दहा ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे वाहन चालकांना कशेडीच्या बोगद्यामध्येही पावसाचा अनुभव मिळत आहे. संबंधित ठेकेदाराकडून बोगद्यात कोसळणारे पाण्याचे धबधबे रोखण्यासाठी सात ते आठ ठिकाणी पत्रे लावले आहेत. मात्र सिमेंटच्या फेंसिंगमधून पाण्याचे फवारे बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी तज्ञांकडून पाहणी केली असून त्यावर ठोस उपाययोजना केली जाईल, अशी माहिती पाहणी दरम्यान दिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा आहे. दोन्ही बाजूकडील वाहतुकीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून बोगदा सुरू करण्यात आला आहे. दुसऱया बोगद्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे एकाच बोगद्यातून लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मात्र या पहिल्याच पावसामध्ये कशेडी बोगद्याला ठिकठिकाणी गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कशेडी बोगद्यातील गळती थांबवण्यासाठी व थेट वाहनांवर पडणारे पाणी रोखण्यासाठी मलमपट्टी म्हणून कशेडी बोगद्याच्या ठेकेदाराने बोगद्याला पत्रे लावले आहेत.

कशेडी बोगद्याला लागलेली गळती व बोगद्यातून छतावरून कोसळणारे पाणी या घटनेची नुकतीच काही दिवसांपूर्वी जिओलॉजीकल तज्ञांनी पाहणी केली असून ही गळती रोखण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे.
– संतोष शेलार,
मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग