गोपीचंद पडळकर यांना कायदेशीर नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. सात दिवसांत पडळकर यांनी पवार, सुळे यांची माफी न मागितल्यास दिवाणी, फौजदारी दावा दाखल करण्याबरोबरच निवडणूक आयोगातील प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचा इशारा या नोटिसीतून देण्यात आला आहे.

बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रीया आवले, अॅड. बाळकृष्ण निढाळकर, अॅड. अवंती जायले यांच्यामार्फत पडळकर यांना नोटीस बजावली आहे.

पडळकर यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. पडळकर हे जाणूनबुजून पवार कुटुंबीयांबाबत सातत्याने बेताल वक्तव्ये करतात. निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणाऱ्या पडळकर यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून स्वतŠ विचारशून्य व्यक्ती असल्याचे सिद्ध केले आहे.

पडळकर यांनी सात दिवसांच्या आत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांची स्वतंत्रपणे लेखी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर दिवाणी, फौजदारी, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगात खोटी माहिती दिल्या प्रकरणी खटला दाखल करण्याचा इशारादेखील या नोटिशीमधून पडळकर यांना देण्यात आला आहे.