लेन्स आय – हिमालयीन पक्षी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ऋता कळमणकर

काही काही पक्षी त्यांच्या गडद, चमकदार आणि विविध रंगांच्या उधळणीमुळे लक्ष वेधून घेतात. काही एक-दोनच रंग धारण करतात, पण अगदी सुंदर रंगसंगती साधतात. पंख वेगळे, चोच वेगळी, पंखाच्या टोकाचा रंग वेगळा, डोळय़ावर काळी किंवा पांढरी पट्टी ठळक लक्षात राहते. असाच अगदी नवरंगांची उधळण करणारा पक्षी म्हणजे हिमालयीन मोनाल. हा पक्षी पाहण्याची आणि फोटो काढण्याची माझी गेल्या काही वर्षांपासूनची इच्छा यंदा पूर्ण झाली. या अशा रंगीत पक्ष्यांना पाहताच मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे, यांना हे रंग कसे प्राप्त होतात. पक्षी शरीरात मेलॅनिन हे पिगमेंट स्वतः तयार करतात, परंतु निळे, पिवळे, तांबडे रंग त्यांना त्यांच्या खाण्यात येणाऱया फळे, बेरी, बिया यांच्यामध्ये असणाऱया कॅरोटेनॉइड पिगमेंटमुळे प्राप्त होतात. जेव्हा जोडीदार निवडण्याची वेळ येते तेव्हा मादी जास्त तेजस्वी व गडद रंगाचा नर निवडते. कारण त्यांचे गडद रंग हे त्यांच्या चांगल्या आरोग्याचे प्रतीक असते. त्यातल्या त्यात उष्ण कटिबंधातील पक्षी जास्त रंगीत आढळतात.

हिमालयीन मोनाल हा पिझण्ट फॅमिलीतला आकाराने मोठा पक्षी, साधारण कोंबडीच्या आकाराचा. हिमालयाच्या बर्फाच्छादित प्रदेशात समुद्रसपाटीपासून साधारण 2 हजार 500 ते 4 हजार मीटरपर्यंत हिमालयातील पर्वतरांगांवर निवास करणारा, अतिसुंदर, अतिशय vibrant रंग धारण करणारा हा पक्षी हिवाळय़ात सहजी दिसतो अशी माहिती मिळाली होती, परंतु मला मात्र तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दिसला. उन्हामध्ये हा बाहेर येणे पसंत करत नाही. कारण याच्या लक्षवेधी रंगामुळे हा शिकारी पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडू शकतो. सकाळी लवकर व सायंकाळी उन्हे उतरल्यावर दर्शन देतो. पूर्ण वाढ झालेला नर पाहणे खूपच आनंदनदायी होते. मखमली निळा, लाल, हिरव्या पाचूचा चमकदार रंग, विटकरी पंखाचे टोक, डोईवर ऐटबाज तुरा, मादी तपकिरी, पण निळय़ा सुंदर डोळय़ांची, नराइतकीच देखणी. बर्फाच्या आसपास किंवा बर्फावर त्याच्या मूळ अधिवासात त्याचा फोटो घेण्यासाठी मी खूप धावाधाव केली. कारण मला हा अजिबात सहजासहजी दिसला नाही.

मग्न होऊन गवतात किडे, अन्न शोधताना पाहण्यात आला. झाडांची मुळे, कंद, बेरी, किडे हे याचे खाणे. हिमालयातील पर्वतराजीमध्ये फोटोग्राफी करणे तसे अवघडच आहे. कारण एका बाजूला दरी, दुसरीकडे डोंगर, मध्ये एखादा सपाट प्रदेश मिळविणे अवघडच. मोनाल हा पक्षी नेपाळचा राष्ट्रीय पक्षी आहे. हिमालयातील रहिवासी असणारा मोनाल, तिबेट, नेपाळ, भूतान, कश्मीरचा काही भाग येथे आढळतो.

या सुंदर पक्ष्याला धोका आहे तो हिमबिबळय़ाचा. हा हिमबिबळय़ा यांना खातो, परंतु त्याहीपेक्षा यांना धोका आहे तो स्थानिक कुत्र्यांचा. हे मोठमोठे धिप्पाड कुत्रे मोनाल बाहेर पडण्याच्या बरोबर वेळी आजूबाजूला हिंडतात. दिसला की, पाठलाग करून पकडून खातात. मोनालची अंडी सापडली की, ती फस्त करतात. बिचारे पक्षी फक्त आकांत मांडतात, घाबरून लवकर येत नाहीत, लपून राहतात. खरं तर आपल्या फक्त हिमालयात दिसणारा हा दुर्मीळ जीव, स्थानिक कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे संख्येने रोडावत जात आहे. हे दुर्मीळ जीव या घडीला महत्त्वाचे आहेत. यासाठी येथील पक्षीप्रेमींनी वारंवार प्रयत्न केले आहेत, परंतु त्याला यश नाही. ही समस्या सुटणे गरजेचे आहे.

हिमालयाच्या पायथ्याशी जो आढळतो तो हिरव्या चमकदार रंगाचा दुसरा पक्षी म्हणजे कॉमन ग्रीन मॅकॅपए. यालाही कॅमेऱयात कैद करण्याची इच्छा यंदा पूर्ण झाली. चमकदार गडद हिरवे अंग, शेपटीच्या टोकाशी चॉकलेटी रंगावर पांढरे ठिपके आणि जुन्या जमान्यातील नायिकेप्रमाणे डोळय़ाभोवती जाड जाड लायनर लावल्याप्रमाणे काळी रेखीव पट्टी. कावळय़ाच्या कुळातील हा पक्षी झाडातच घरटे बनवतो. हिमालयाचा पायथा, चीनच्या सुमात्रा येथे दिसून येतो. किडे, गांडुळे, कधी कधी मेलेल्या जनावरांचे अवशेष, कोळी, कीटक, फळे, बिया इत्यादी खातो.

– [email protected]