
रबाळे येथील एका हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱया प्रियकराला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. प्रियकराला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने कायम ठेवत त्याचे अपील फेटाळून लावले. सुमित गिरी असे त्या आरोपीचे नाव आहे.
20 मार्च 2008 साली रबाळे येथील हॉटेलमध्ये सुमित बेशुद्ध तर त्याची प्रेयसी समंथा रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी तपास केला असता सुमित याने समंथा हिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. हत्या केल्यानंतर त्याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारानंतर शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी सुमितला अटक केली. याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. त्यावर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
म्हणे आमच्यावर अज्ञातांनी हल्ला केला
सुनावणीवेळी सुमित याने बाजू मांडताना खंडपीठाला सांगितले की, आमच्यावर तिघा अज्ञात इसमांनी हॉटेलमध्ये हल्ला केला, मात्र सरकारी वकिलांनी त्याचा हा दावा साफ खोटा असल्याचे सांगत समंथाची हत्या केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व आरोपीचे अपील फेटाळून लावण्याची मागणी केली. खंडपीठाने याची दखल घेत सत्र न्यायालयाने प्रियकर सुमितला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.



























































