
‘महाराष्ट्र शाहीर’ हा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या 28 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. एका नातवाने आजोबांवर दिग्दर्शित केलेला चित्रपट, एका पणतीने तिच्या पणजीची केलेली भूमिका या गोष्टी या चित्रपटात जमून आल्या आहेत. शाहिरांच्या प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे. शाहिरांच्या पत्नीची म्हणजे भानुमती यांची भूमिका केदार शिंदे यांची मुलगी सना केदार शिंदे करत आहे. यानिमित्ताने सनाशी साधलेला संवाद.
पणजोबांविषयी म्हणजेच शाहीर साबळे यांच्याविषयी काय सांगशील…
मोठय़ा बाबांमुळे (शाहीर) बाबांवर किंवा संपूर्ण कुटुंबावर संस्कार झाले आहेत. तेच संस्कार बाबांनी आम्हा मुलांपर्यंत पोहोचवले आहेत. आपली संस्कृती जपणे, लोककलेबद्दलची त्यांची आस्था या सर्वच गोष्टी मोठय़ा बाबांच्या माध्यमातूनच आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. तो त्यांचाच वारसा आहे.
पणजीच्या भूमिकेसाठी काय तयारी केलीस ?
भानुमती साबळे म्हणजे माझी पणजी आणि शाहीर साबळे यांची पहिली पत्नी या खूप चांगल्या लेखिका होत्या, पण त्या आयुष्य कसे जगल्या, त्यांच्याबरोबर काय काय घडले, किती गोष्टी घडल्या हे मला या चित्रपटाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेतून जाताना कळले. मी जेव्हा माझ्या आजींशी बोलले, बाबांशी बोलले आणि काही डायऱ्या, ज्या आम्हाला सापडल्या होत्या, त्यांचा अभ्यास केल्यावर पणजीबद्दल खूप काही मिळाले. डायऱ्यांमध्ये खूप काही लिहिलंय त्यांच्याबद्दल. त्या सगळ्यांचा अभ्यास करून, सर्वांचा अनुभव जाणून घेऊन सगळ्या गोष्टी ऐकून ही व्यक्तिरेखा उभी राहिली आहे. माझ्यासाठी खरे सांगायचे तर बाबांनी आणि आजीने जे सांगितले किंवा मोठय़ा बाबांच्या (शाहीर) ज्या डायऱया सापडल्या त्यातूनच खरा अभ्यास झाला. कारण बाहेर कुणीच काही लिहून ठेवलेले नव्हते भानुमती यांच्यासंबंधी.
‘महाराष्ट्र शाहीर’ निर्मितीच्या वेळची एखादी अविस्मरणीय अशी घटना सांगू शकशील?
अख्खा चित्रपटच माझ्यासाठी अविस्मरणीय होता. कार्यशाळा असू दे, चित्रीकरण असू दे की डबिंग किंवा प्रमोशन, सगळे अनुभव अविस्मरणीय होते. ‘फर्स्ट टाइम इज ऑल्वेज स्पेशल’ म्हणतात ना, अगदी तसेच. माझ्यासाठी माझी ही ‘ड्रीम फिल्म’ आहे.
भूमिका साकारताना सर्वात कठीण असे काय होते ?
ही भूमिका खूपच कठीण होती. कारण या भूमिकेला खूपच वैविध्यपूर्ण कडा आणि छटा आहेत. कारण मी 18 वर्षांची भानुमती पण आहे आणि त्याचबरोबर मी 60 वर्षांची भानुमतीही करते आहे. त्यामुळे अख्खा कालखंड या भूमिकेत दाखवायचा होता. प्रेमात पडणे, लग्न, बाळंतपण, मुलं या सगळ्या गोष्टी त्यात आल्या. पणजीचा तो प्रवास मला अनुभवायला मिळाला.
























































