घरच्या घरी करा काकडीचे फेशियल मिस्ट; त्वचा होईल चमकदार, तजेलदार आणि मुलायम

हिवाळ्यात कोरड्या आणि रुक्ष त्वचेचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि मुलायम राहावी यासाठी घरच्या घरी काकडीचे फेशियल मिस्ट करू शकता. यामुळे चेहरा टवटवीत आणि मुलायम होईल. चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होऊन सुरकुत्या कमी व्हायला मदत होईल.

चमकदार आणि सुंदर त्वचेच्या हव्यासापोटी लोक वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल करून घेतात तरी कधी कधी हवी तशी चमक चेहऱ्यावर दिसत नाही. कोरड्या रुक्ष त्वचेमुळे विशेषत: हिवाळ्याच्या दिवसांत चेहऱ्याचा आणि एकंदरीत संपूर्ण त्वचेचा पोत बदलतो. चेहऱ्यावर चमक आणणारे टोनर बाजारात उपलब्ध आहेत, मात्र चेहरा कायमस्वरुपी चमकदार होण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचीही गरज असते. अशा वेळी नैसर्गिक पदर्थांचा वापर करून तयार केलेले फेशियल मिस्ट घरच्या घरी करता येईल. काकडीचे फेशियल मिस्ट घरी करून वापरल्यास कोरड्या आणि थंड हवामानामुळे कोरड्या पडलेल्या त्वचेला पुरेसा ओलावा मिळेल. चेहऱ्याची हरवलेली चमकही परत येईल.

काकडीच्या फेशियल मिस्टमध्ये अँण्टीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. याच्या वापरामुळे चेहऱ्याला ग्लो येतो तसेच त्वचेचे पोषणही होते. कोरडी आणि रुक्ष त्वचा मुलायम व्हायला मदत होते. त्वचेवरील सुरकुत्याही नाहिशा होतात.

काकडी फेशियल मिस्ट घरी कसे तयार कराल?

सर्वप्रथम एक हिरवीगार ताजी काकडी घ्या. ती स्वच्छ धुवून तिची साल काढा. आता तिचे तुकडे करा. हे तुकडे एका भांड्यात घ्या. भांडे गॅसवर ठेवून पाण्याला उकळी येऊ द्या. काकडीचे तुकडे पाण्यात व्यवस्थित बुडायला हवेत याची काळजी घ्या. पांच ते सात मिनिटे कमी गॅसवर हे काकडीचे तुकडे ठेवलेले पाणी उकळू द्या. काकडीतील पोषक तत्त्वे पाण्यात उतरायला हवीत. काही वेळाने गॅस बंद करून हे पाणी थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर काकडीचे तुकडे पाण्यातून काढा. मिक्सरमधून वाटून घ्या. आता मिक्सरमध्ये बारीक केलेली काकडी गाळून घ्या. त्यानंतर काकडीची गाळलेली पेस्ट आणि त्यातील पाणी एकत्र करून एका काचेच्या स्प्रे बाटलीत भरून ठेवा. आवडीनुसार यामध्ये गुलाबपाणी टाकू शकता. यामुळे मिस्ट त्वचेसाठी पोषक होईल. आता काकडीचे घरगुती फेशियल मिस्ट तयार झाले.

केव्हा वापराल?

चेहरा कोरडा आणि रुक्ष झाल्यासारखे वाटत असेल तेव्हा हे घरी तयार केलेले फेशियल मिस्ट स्प्रे करा. यामुळे दोन मिनिटांत चेहरा ताजातवाना होईल. काकडी फेशियल मिस्ट मेकअप रिमूव्हर आणि क्लिन्झर म्हणूनही वापरू शकता. यामुळे चेहरा तजेलदार होईल.